MS Dhoni: धोनीच्या निवृत्तीची तारीख ठरली; सीएसकेचा किंग 'या' दिवशी खेळणार आयपीएलचा शेवटचा सामना
MS Dhoni’s Farewell Match Date: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
IPL 2023: जगभरात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या सोळाव्या हंगामाला येत्या ३१ मार्चपासून सुरुवात होत आहे. या हंगामातील पहिला सामना गतविजेता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे. आयपीएलचा यंदाचा हंगाम धोनीच्या कारकिर्दीतील शेवटचा ठरणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, आता धोनीच्या निवृत्तीची तारीख समोर आली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्ट २०२० साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. मात्र, त्याने आयपीएल खेळणे सुरूच ठेवले होते. धोनीचा चाहता वर्ग खूप मोठा असून त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सूक असतात. मात्र, आता धोनीच्या निवृत्तीची बातमी समोर आल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला. धोनी त्याच्या आयपीएल कारकीर्दीतील शेवटचा सामना हा १४ मे २०२३ ला खेळणार असल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे.
धोनीची आयपीएल कारकीर्द
आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून धोनी चेन्नईच्या संघाचा भाग आहे. त्याने चेन्नईच्या संघासाठी आतापर्यंत २३४ सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर ४ हजार ९८७ धावा आहेत. ज्यात २४ अर्धशतकांचा समावेश आहे. अखेरच्या काही षटकात सामन्याचे रुप बदलणाऱ्या धोनीच्या नावावर एकूण २२९ षटकारांची नोंद आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने आतापर्यंत आयपीएलच्या चार ट्रॉफी जिंकल्या आहेत.
महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
महेंद्र सिंह धोनीने 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटी सामन्यांमध्ये त्याने ६ शतक, एक द्विशतक आणि ३३ अर्धशतकांच्या मदतीने ४ हजार ८७६ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण १० हजार ७७३ धावांची नोंद आहे. यामध्ये १० शतक, ७९ अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टी-२० क्रिकेटमध्ये त्याने एकूण १ हजार ६१७ धावा केल्या आहेत.
आयसीसीच्या तीन्ही ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार
आयसीसीच्या सर्व प्रमुख ट्रॉफी (एकदिवसीय विश्वचषक, टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकणारा महेंद्रसिंह धोनी पहिला एकमेव कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ मध्ये पहिल्या टी-२० विश्वचषकावर नाव कोरलं. त्यानंतर २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकवून क्रिकेटविश्वात भारताचा झेंडा फडकवला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं आणखी एक पराक्रम केलाय. त्यानंतर २०१३च्या आयसीसी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडचा पराभव करून इतिहास रचला.