मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Commonwealth Games: भारताला मोठा धक्का, धावपटू धनलक्ष्मी डोपिंगमध्ये अडकली

Commonwealth Games: भारताला मोठा धक्का, धावपटू धनलक्ष्मी डोपिंगमध्ये अडकली

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 20, 2022 11:47 AM IST

Commonwealth Games: जागतिक अॅथलेटिक्सच्या अॅथलीट इंटिग्रिटी युनिट (AIU) ने घेतलेल्या चाचणीत ती दोषी आढळली आहे. AIU ने घेतलेल्या धनलक्ष्मीच्या सॅम्पलमध्ये अॅनाबॉलिक स्टेरॉईड आढळले आहे. त्यामुळे तिच्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.

अॅथलिट धनलक्ष्मी
अॅथलिट धनलक्ष्मी (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Commonwealth Games: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स सुरु होण्याआधीच भारतीय अॅथलेटिक संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय अॅथलीट एस धनलक्ष्मी (S Dhanalaxmi) डोपिंग चाचणीत दोषी आढळली आहे. त्यामुळे ४x१०० मीटर रिलेमध्ये पदक जिंकण्याच्या भारतीयांच्या आशेवर पाणी फेरले आहे. तामिळनाडूची धावपटू एस धनलक्ष्मी ही गेल्या महिन्यात १०० आणि २०० मीटरमध्ये दुती चंद आणि हिमा दास यांना पराभूत करून चर्चेत आली होती.

जागतिक अॅथलेटिक्सच्या अॅथलीट इंटिग्रिटी युनिट (AIU) ने घेतलेल्या चाचणीत ती दोषी आढळली आहे. AIU ने घेतलेल्या धनलक्ष्मीच्या सॅम्पलमध्ये अॅनाबॉलिक स्टेरॉईड आढळले आहे. त्यामुळे तिच्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही खेळण्यास बंदी-

युगेन (US) येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही धनलक्ष्मीला खेळण्यास मनाई करण्यात आली होती. टोकियो ऑलिम्पिकच्या ४x४०० मीटर रिले संघात समाविष्ट असलेल्या धनलक्ष्मीचा हिमा दास आणि दुती चंद यांच्यासह राष्ट्रकुल स्पर्धेसाठी १०० मीटर आणि ४x४०० मीटर रिले संघात समावेश करण्यात आला होता.

भारतीय संघ वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी युगेनला रवाना झाला, पण धनलक्ष्मीला संघासोबत जाता आले नाही. तेव्हा तिचा व्हिसा लागू झाला नसल्याचे सांगण्यात आले होते, मात्र आयोजकांनी चॅम्पियनशिपमधून तिची प्रवेशिकाच काढून टाकली होती. त्याचवेळी, या चॅम्पियनशिपमध्ये, केनियाच्या खेळाडूला शर्यत सुरू होण्याच्या दोन तास आधी १०० मीटरमध्ये प्रवेश देण्यात आला होता. तोही व्हिसाअभावी युगेनपर्यंत पोहोचू शकला नव्हता, पण त्याची एंट्री काढली गेली नाही. डोपमध्ये अडकल्यामुळेच धनलक्ष्मीला काढण्यात आले होते.

AIU ने पकडलेली धनलक्ष्मी तिसरी भारतीय खेळाडू-

भारतीय खेळाडूंच्या परदेशात झालेल्या तयारीदरम्यान त्यांचे सॅम्पल घेण्यात आले होते, अशी माहिती आहे. पण, त्यानंतर देशातल्या नाडाच्या चाचणीत धनलक्षमीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. गेल्या काही महिन्यांतील हे तिसरे प्रकरण आहे, जेव्हा एआययूने डोपिंगसाठी भारतीय खेळाडूला दोषी ठरवले आहे. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहाव्या स्थानावर राहिलेली भालाफेकपटू राजिंदर सिंग, डिस्कस थ्रोअर कमलप्रीत कौर हेही एआययूच्या चाचणीत पॉझिटिव्ह आले  होते.

WhatsApp channel

विभाग