मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CWG2022: कॉमनवेल्थचा इतिहास माहितीय का? आधी ब्रिटिश एम्पायर गेम्स म्हटलं जायचं

CWG2022: कॉमनवेल्थचा इतिहास माहितीय का? आधी ब्रिटिश एम्पायर गेम्स म्हटलं जायचं

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jul 23, 2022 11:37 PM IST

यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्स इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये होणार आहेत. याचा शुभंकर पेरी असून शेअर द ड्रीम असं ब्रीद असणार आहे. भारताने या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत एकूण ५०३ पदके जिंकली आहेत

Commonwealth Games 2022
Commonwealth Games 2022 (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games) म्हणजेच राष्ट्रकूल स्पर्धेत अनेक देशांचे खेळाडु सहभागी होतात. त्यामध्ये एकाच वेळी अनेक खेळाच्या स्पर्धा होतात. ऑलिम्पिकचे जे देश सदस्य आहेत ते सर्व देश यामध्ये सहभागी असतात. दर चार वर्षातून एकदा होणाऱ्या या स्पर्धेमध्ये ऑलिम्पिकमधील सर्व खेळांचा समावेश असतो. याशिवाय राष्ट्रकूल स्पर्धेचे काही खास खेळही आहेत. या खेळाच्या आयोजनाचं व्यवस्थापन कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन पाहते.

कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन पहिल्यांदा १९३० मध्ये कॅनडातील (Canada) हॅमिल्टन शहरात करण्यात आलं होतं. त्यावेळी या खेळाचे नाव ब्रिटिश एम्पायर गेम्स (British Empire Games) असं होतं. ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या एशली कूपर यांनी पहिल्यांदा १८९१ मध्ये अशा प्रकारच्या खेळाच्या आयोजनाचा प्रस्ताव मांडला होता. या माध्यमातून ब्रिटीश साम्राज्याच्या एकतेचं आणि सोहार्दाचं प्रदर्शन होऊ शकेल. आपआपसातील शांतता आणि सौहार्द टिकवण्यासाठी या स्पर्धेचा प्रस्ताव एशली कूपर यांनी तत्कालीन राजकीय नेत्यांना दिला होता. १९२८ मध्ये कॅनडातील प्रमुख अॅथलीट बॉबी रॉबिन्सन यांच्यावर पहिल्या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. १९३० ला झालेल्या स्पर्धेत ११ देशांमधील ४०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

राष्ट्रकूल स्पर्धेच्या नावाचा प्रवास

ब्रिटिश एम्पायर गेम्स ते कॉमनवेल्थ गेम्स असा या स्पर्धेच्या नावाचा प्रवास झाला आहे. १९५४ मध्ये ब्रिटिश एम्पायर आणि कॉमनवेल्थ गेम्स अशा नावाने संबोधलं गेलं तर १९७० ब्रिटिश कॉमनवेल्थ गेम्स म्हटलं गेलं. त्यानंतर १९७४ मध्ये कॉमनवेल्थ गेम्स हे नाव होत. तर अखेर १९७८ मध्ये सर्वांच्या संमतीने याला कॉमनवेल्थ गेम्स असं नाव दिलं गेलं ते आजपर्यंत कायम आहे.

<p>कॉमनवेल्थ गेम्सचा यंदाचा शुभंकर 'पेरी'</p>
कॉमनवेल्थ गेम्सचा यंदाचा शुभंकर 'पेरी' (एएनआय)

शुभंकर आणि ब्रीद

यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्स इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये होणार आहेत. २८ जुलैला सुरू होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स ८ ऑगस्टपर्यंत सुरू राहतील. या हंगामात जवळपास १९ खेळांचे सामने रंगतील. बर्मिंघम २०२२ च्या कॉमनवेल्थ गेम्सचा शुभंकर हा पेरी आहे. एका बहुरंगी अशा बैलासारखा तो दिसत असून तो शक्तिशाली, दयाळू आणि थोडा मस्तीखोर असा आहे. यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्सचं ब्रीद हे शेअर द ड्रीम असं आहे.

२०२६ चे कॉमनवेल्थ गेम्स

इंग्लंडनंतर पुढच्या कॉमनवेल्थ गेम्सचं ठिकाणही ठरलं आहे. २०२६ च्या कॉमनवेल्थ गेम्स या ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियात होणार आहेत. आतापर्यंतच्या कॉमनवेल्समध्ये २०२६ चे आयोजन खास असे असणार आहे. पहिल्यांदाच या स्पर्धा अनेक शहरात होतील. यामध्ये बॅलरेट, बेंडिगो, जिलॉन्ग, गिप्सलँड आणि मेलबर्न या शहरांचा समावेश आहे.

<p>क्विन्स बॅटन रिले</p>
क्विन्स बॅटन रिले (फोटो - एपी)

क्विन्स बॅटन रिले

कॉमनवेल्थ गेम्समध्ये महत्त्वाच्या परंपरांपैकी असलेली क्वीन्स बॅटन रिले ही एक आहे. यंदाची बॅटन गेल्या वर्षी सात ऑक्टोबरला ब्रिटनच्या बकिंगघम पॅलेसमधून निघाली होती. ती ७२ देशांचा प्रवास २९४ दिवसात करून बर्मिंघमला पोहोचेल. भारतात ही बॅटन १२ जानेवारी २०२२ ला राजधानी दिल्लीत आली होती. या बॅटनसोबत ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ द्वितीयचा खास मेसेजसुद्दा असतो.

कॉमनवेल्थमध्ये भारत

भारतात २०१० मध्ये कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्यांदाच भारतात या स्पर्धा झाल्या होत्या. त्याआधी भारताने १९८२ मध्ये एशियन गेम्सचे आयोजन केले होते. जवळपास तीन दशकानंतर इतक्या मोठ्या स्पर्धेचे यजमानपद भारताने भूषवले होते. त्याच वर्षी भारताना कॉमनवेल्थ गेम्समध्ये सर्वाधिक पदके जिंकली होती. १०१ पदके जिंकून दुसरं स्थान पटकावलेल्या भारताने ३८ सुवर्ण, २७ रौप्य तर ३६ कांस्य पदकांची कमाई केली होती. आतापर्यंत भारताने एकूण ५०३ पदके जिंकली असून त्यात १८१ सुवर्णपदके, १७३ रौप्य पदके, १४९ कांस्य पदके आहेत.

WhatsApp channel