मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CWG 2022: भारताच्या ६ क्रिकेटपटूंना अद्यापही व्हिसा नाही, २८ जुलैपासून स्पर्धा

CWG 2022: भारताच्या ६ क्रिकेटपटूंना अद्यापही व्हिसा नाही, २८ जुलैपासून स्पर्धा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 22, 2022 09:09 PM IST

Commonwealth Games 2022: महिला क्रिकेटचा प्रथमच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. टीम इंडिया सध्या बंगळुरूमध्ये सराव करत आहे. संघ रविवारी बर्मिंगहॅमला रवाना होणार आहे.

CWG 2022
CWG 2022

Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. मात्र, भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ६ सदस्यांना अद्याप यूकेचा व्हिसा मिळालेला नाही. महिला क्रिकेटचा प्रथमच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. टीम इंडिया सध्या बंगळुरूमध्ये सराव करत आहे. ते रविवारी बर्मिंगहॅमला रवाना होणार आहेत. बीसीसीआय या प्रकरणी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) संपर्कात आहे.

आयओएच्या एका सूत्राने एका वृत्तसंस्थेला सांगितले की, “आज काही व्हिसा मिळाले आहेत, परंतु ६ व्हिसा मिळणे बाकी आहे. यामध्ये ३ खेळाडू आणि ३ सपोर्ट स्टाफचा समावेश आहे. उर्वरित व्हिसा उद्यापर्यंत मिळाले पाहिजेत".

हरमनप्रीत कौर करणार टीम इंडियाचे नेतृत्व-

राष्ट्रकुल क्रि़डा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची ११ जुलै रोजी घोषणा करण्यात आली. हरमनप्रीत कौर भारताची कर्णधार असणार आहे. राष्ट्रकुल क्रि़डा स्पर्धेत २४ वर्षांनंतर क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. शेवटच्या वेळी १९९८ मध्ये क्रिकेट या स्पर्धेचा भाग होता. यावेळी राष्ट्रकुल स्पर्धेत फक्त महिला क्रिकेटचाच समावेश झाला आहे. कसोटी क्रिकेटसाठी प्रसिद्ध असलेल्या एजबॅस्टनमध्ये क्रिकेटचे सर्व सामने होणार आहेत. स्पर्धेत क्रिकेटचे ८ संघ सहभागी होणार आहेत.

भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध-

भारत अ गटात ऑस्ट्रेलिया, बार्बाडोस आणि पाकिस्तानसोबत आहे. ब गटात श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांना स्थान देण्यात आले आहे. टीम इंडिया २९ जुलैला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. दोन्ही गटातील अव्वल २ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.

भारतातून ३२२ सदस्यीय संघ बर्मिंगहॅमला जाणार-

या खेळांसाठी ३२२ सदस्यीय भारतीय संघ आधीच जाहीर करण्यात आला आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) या संघात २१५ खेळाडूंचा समावेश केला आहे. तर १०७ अधिकारी आणि सहाय्यक कर्मचारी असतील.  या संघात १०८  पुरुष आणि १०७ महिला खेळाडूंचा समावेश आहे. 

दक्षिण आफ्रिकेने जिंकले होते सुवर्ण- 

यावेळच्या राष्ट्रकुल स्पर्धेत १९ खेळांचा थरार पाहायला मिळणार आहे. यापूर्वी क्वालालंपूर राष्ट्रकुल स्पर्धेत शेवटचा क्रिकेट खेळाचा समावेश झाला होता. त्यावेळी ५० षटकांचे सामने खेळवले गेले होते व फक्त पुरुष संघांनी भाग घेतला होता. दक्षिण आफ्रिकेने सुवर्ण, ऑस्ट्रेलियाने रौप्य आणि न्यूझीलंडने कांस्यपदक जिंकले होते.

क्रिकेटचा भारतीय संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, एस मेघना, तानिया भाटिया (डब्ल्यूके), यास्तिका भाटिया (डब्ल्यूके), दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव, हरलीन देओल, स्नेह राणा.

स्टँडबाय खेळाडू: सिमरन दिल बहादूर, रिचा घोष, पूनम यादव.

WhatsApp channel