Zhang Zhijie Death At Badminton Court : इंडोनेशियात सुरू असलेल्या आशिया ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. चीन आणि जपान यांच्यात सामना सुरू असताना ही घटना घडली. या सामन्यात बॅडमिंटन कोर्टवर चीनचे प्रतिनिधित्व झांग झिजी याने केले तर जपानचे प्रतिनिधित्व काझुमा कावाना याने केले.
या सामन्यादरम्यान चीनचा खेळाडू अचानक कोर्टवर कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. आता या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक यूजर्स त्याच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित करत आहेत.
झांग झिजी रविवारी (३० जून) संध्याकाळी उशिरा जपानच्या काझुमा कावानाविरुद्ध एकेरीचा सामना खेळत होता. पहिला गेम ११-११ असा सुरू असताना अचानक झांग झिजी जमिनीवर पडला. त्याच्यावर तिथेच उपचार करण्यात आले आणि नंतर ॲम्ब्युलन्सने त्याला हॉस्पिटलमध्ये नेले, पण त्याला वाचवता आले नाही.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. झांग झिजी पडल्यानंतर सुमारे ४० सेकंदांचा विराम असल्याचे व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते. त्यानंतर डॉक्टर त्यांच्या मदतीला धावतात. व्हिडिओमध्ये झांग झिजी पडल्यानंतर मदत करण्यासाठी एक माणूस धावत आलेला दिसत आहे, परंतु तो थांबतो आणि पुढील सूचनांसाठी कोर्टबाहेर पाहत असल्याचे दिसते.
पीबीएसआयच्या प्रवक्त्याने नंतर पत्रकारांना सांगितले की वैद्यकीय पथकाने एक नियम पाळला पाहिजे, ज्यानुसार बॅडमिंटन कोर्टवर प्रवेश करण्यापूर्वी रेफरीची परवानगी आवश्यक आहे.
पण चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर युजर्सनी संतापाचे वादळ उठवले असून अनेकांनी या नियमांचा तीव्र निषेध केला आहे. हजारो लोकांनी लाइक केलेल्या एका कमेंटमध्ये म्हटले आहे, "काय अधिक महत्त्वाचे आहे - नियम की एखाद्याचा जीव?"
या घटनेनंतर बॅडमिंटन एशिया आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडोनेशिया (PBSI) यांनी एक निवेदन सादर केले आहे. "चीनचा खेळाडू झांग झिजी रविवारी संध्याकाळी एका सामन्यादरम्यान कोर्टवर कोसळला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्याचा रात्री ११:२० वाजता मृत्यू झाला," असे निवदेनात म्हटले आहे.
झिजी कोसळल्यानंतर मैदानावरच त्याच्यावर टूर्नामेंट डॉक्टर आणि वैद्यकीय पथकाने उपचार केले आणि त्याला २ मिनिटांत रुग्णालयात नेले. बॅडमिंटन जगताने एक प्रतिभावान खेळाडू गमावला, असेही निवेदनात म्हटले आहे.
संबंधित बातम्या