भारताचा युवा स्टार डी गुकेश गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी गुकेशने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. आता त्याच्या बक्षीस रकमेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मागील चॅम्पियन डिंग लिरेन याचा पराभव करून ग्रँडमास्टर डी गुकेश नवा चॅम्पियन बनला. तो सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन ठरला.
तर विश्वनाथन आनंद याच्यानंतर हे विजेतेपद पटकावणारा गुकेश हा दुसरा भारतीय ठरला आहे. चॅम्पियन बनल्यानंतर गुकेशला बंपर बक्षीस मिळाले मात्र, आता त्याची बक्षिसाची रक्कम निम्मी करण्यात येणार असल्याची बातमी समोर आली आहे.
वास्तविक, भारत सरकार त्याच्या बक्षीस रकमेपैकी ४२.५ टक्के कर म्हणून घेईल. डी गुकेशला वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकल्यानंतर सुमारे ११.३ कोटी रुपये मिळाले. आता यातून जवळपास ५ कोटी रुपये कापले जाणार आहेत. गुकेशच्या बक्षीस रकमेतून सुमारे ४.६७ कोटी रुपये कर म्हणून कापले जातील. त्याला ही रक्कम सरकारला द्यावी लागणार आहे.
जेव्हा एखाद्या खेळाडूला सरकार किंवा त्या क्रीडा संघटनेकडून कोणतेही पैसे मिळतात, तेव्हा त्याला त्यावर कर भरावा लागत नाही, परंतु एखादी स्पर्धा जिंकल्यानंतर खेळाडूला मिळणाऱ्या बक्षीस रकमेवर सरकार कर वसूल करते. त्यामुळे चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर गुकेशला मिळणाऱ्या बक्षीस रकमेवर कर भरावा लागणार आहे.
डी गुकेश याचा जन्म २९ मे २००६ रोजी चेन्नई येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव रजनीकांत असून ते व्यवसायाने नाक, कान आणि घसा तज्ञ डॉक्टर आहेत. त्याची आई पद्मा या देखील व्यवसायाने डॉक्टर आहेत.
गुकेश तेलगू भाषिक कुटुंबातील असून वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी त्याने बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली. डी गुकेशने वयाच्या अवघ्या ९व्या वर्षी पहिले विजेतेपद जिंकले. वयाच्या अवघ्या ९व्या वर्षी त्याने अंडर-९ आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. तीन वर्षांनंतर, त्याने १२ वर्षांखालील स्तरावर जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा जिंकली.
२०१८ च्या आशियाई युवा बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये वयाच्या १२ व्या वर्षी त्याने एक, दोन नव्हे तर ५ सुवर्णपदके जिंकली. मार्च २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर टूर्नामेंट जिंकून तो इतिहासातील तिसरा सर्वात तरुण बुद्धिबळ ग्रँड मास्टर बनला.
संबंधित बातम्या