भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिला रौप्य पदक देण्याच्या याचिकेवर CAS काय निर्णय देते याची प्रतीक्षा संपूर्ण भारत करत आहे. आज (१० ऑगस्ट) या प्रकरणी निर्णय येण्याची अपेक्षा होती. पण आता विनेश फोगटच्या खटल्यातील निकालाची वेळ ११ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.
रविवारी (११ ऑगस्ट) भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६ वाजेपर्यंत विनेशला पदक मिळणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. तर या खटल्याचा सविस्तर आदेश नंतर जारी केला जाईल.
यापूर्वी CAS (क्रिडा लवाद न्यायालय) ने निर्णय देण्यासाठी भारतीय वेळेनुसार १० ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजेपर्यंत वेळ दिला होता. मात्र आता ११ ऑगस्टला निकाल जाहीर होणार आहे. डॉ. ॲनाबेल बेनेट या खटल्याचा निकाल देणार आहेत. म्हणजेच विनेशला आणखी २४ तास प्रतीक्षा करावी लागेल.
जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आता विनेश फोगटच्या अपात्रतेच्या प्रकरणाचा निर्णय ११ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता येईल. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने (UWW) विनेश फोगटला ५० किलो गटातील महिला कुस्तीच्या अंतिम सामन्यापूर्वी अपात्र ठरवले होते, कारण तिचे वजन निर्धारित मानकांपेक्षा १०० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. विनेश फोगट आणि UWW या दोघांनाही त्यांचे वकील निवडण्याची संधी देण्यात आली.
विनेशने तिच्या अपात्रतेविरुद्ध ७ ऑगस्ट रोजी अपील दाखल केले होते आणि शुक्रवारी (९ ऑगस्ट) झालेल्या सुनावणीत ती स्वतः हजर होती. प्रथम फ्रेंच वकिलांनी भारतीय कुस्तीपटूच्या वतीने युक्तिवाद केला, त्यानंतर UWW वकिलांनीही त्यांची बाजू मांडली. यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने सिनेट सदस्य अधिवक्ता हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया यांनीही युक्तिवाद केला.
त्यानंतर यूडब्ल्यूडब्ल्यूनेही आपली बाजू मांडली आणि सुमारे तासभर सुनावणी चालली. प्रकरणाचा निर्णय १० ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ९:३०े वाजता जाहीर होणार होता, मात्र सध्या विनेश फोगट आणि भारतीय चाहत्यांची प्रतीक्षा काही तासांनी वाढली आहे. CAS अंतरिम निर्णय देईल आणि नंतर औपचारिकपणे निर्णयाचे निवेदन जारी करेल.
विनेशने यापूर्वी अंतिम सामना खेळू देण्याचे आवाहन केले होते, परंतु ते फेटाळण्यात आले. यानंतर विनेशला रौप्य पदक देण्यात यावे, या याचिकेवर सुनावणी झाली.