Budget 2025 Khelo India Sports : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी (१ फेब्रुवारी) देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरील कर माफ करून मध्यमवर्गीयांना दिलासा दिला आहे. याशिवाय या अर्थसंकल्पातून क्रीडा जगतालाही मोठा फायदा मिळणार आहे.
भारत सरकार देशातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी केंद्र सरकारतर्फे खेलो इंडिया योजना चालवली जाते. या अंतर्गत तळागाळात क्रीडा पायाभूत सुविधा वाढवणे, युवकांची खेळातील आवड वाढवणे आणि देशात क्रीडा संस्कृती निर्माण करण्याचे काम केले जाते.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात 'खेलो इंडिया'च्या बजेटमध्ये मोठी वाढ करण्याची घोषणा केली.
खेलो इंडिया' साठी अर्थमंत्र्यांनी १००० कोटी रुपयांची तरतूद केली असून, त्यात गेल्या वेळेच्या तुलनेत १०० कोटी रुपयांची वाढ केली आहे. या योजनेसाठी गेल्या वेळी ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
गेल्या वेळीही खेलो इंडियाचे बजेट वाढवण्यात आले होते. अर्थमंत्र्यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात या योजनेचे बजेट ८८० वरून २० कोटी रुपयांनी वाढवून ९०० कोटी रुपये केले होते. तर २०२२-२३ या आर्थिक वर्षात खेलो इंडियासाठी ५९६.३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
सरकारने पुढच्याच अर्थसंकल्पात त्यात ४०० कोटी रुपयांची वाढ करून ती १००० कोटी रुपये केली. मात्र, नंतर ते ८८० कोटी रुपये करण्यात आले.
खेलो इंडिया ची सुरुवात २०१८ मध्ये झाली होती. तेव्हापासून, भारत सरकारने या योजनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. देशाच्या विविध भागातून उदयोन्मुख टॅलेंड समोर आणणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
गेल्या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये पॅरिस ऑलिम्पिक झाले होते. त्याच वेळी, भारत सरकारने संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी क्रीडा मंत्रालयाच्या बजेटमध्ये ४५.३६ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आणि एकूण ३४४२.३२ कोटी रुपयांची तरतूद खेळांसाठी करण्यात आली होती.
त्याआधी क्रीडा अर्थसंकल्पासाठी ३३९६.९६ कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली होती. मात्र, यावेळी अर्थसंकल्प केवळ खेलो इंडियासाठी जाहीर करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या