Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचं मैदान गाजवणाऱ्या भारताला धक्का बसला आहे. फायनलपर्यंत धडक मारलेली व सुवर्ण पदकाची आशा जागवणारी कुस्तीपटू विनेश फोगाट हिचं पदक हुकलं आहे. अति वजनामुळं तिला अपात्र करण्यात आलं आहे.
इंडियन ऑलिम्पिक असोसिएशननं (IOA) या संदर्भात निवेदन प्रसिद्धीस दिलं आहे. त्यानुसार, महिला कुस्तीच्या ५० किलो वजनी गटातून विनेश फोगाटला अपात्र ठरविण्यात आलं आहे. रात्री सर्व प्रयत्न करूनही आज सकाळी तिचं वजन ५० किलोपेक्षा काही ग्रॅम जास्त भरलं आहे. तूर्त भारतीय चमूकडून दुसरी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आता उर्वरित स्पर्धेवर आम्ही लक्ष केंद्रित केलं आहे, असं भारतीय चमूकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनेशचं वजन प्रमाणित मर्यादेपेक्षा अंदाजे १०० ग्रॅम जास्त भरलं आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, फोगाट रौप्य पदकासाठीही पात्र होणार ठरणार नाही. या गटातील स्पर्धेत फक्त सुवर्ण आणि कांस्यपदक विजेते घोषित केले जातील.
विनेश फोगाट हिनं यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जोरदार कामगिरी केली. उपांत्यपूर्व फेरीत तिनं टोकियो २०२० चॅम्पियन जपानच्या युई सुसाकीचाही पराभव केला. विशेष म्हणजे जपानच्या कुस्तीपटूचा हा ८२ आंतरराष्ट्रीय सामन्यांतील पहिला पराभव होता. त्यानंतर विनेशनं उपांत्य फेरीत क्युबाच्या युस्नेलिस गुझमनचा ५-० असा पराभव केला. ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली.
७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत भारताला आणखी एक ऑलिंपिक पदक मिळेल आणि त्याचा रंग कमीत कमी रुपेरी असेल अशी आशा भारतीयांना होती. त्यासाठी देशभरातून विनेशला शुभेच्छा दिल्या जात होत्या. मात्र, आता तसं होणार नाही. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारतानं तीन पदकं जिंकली असून मंगळवार ६ ऑगस्टच्या रात्री विनेश फोगटनं अंतिम फेरी गाठत पदक पक्कं केलं, पण फायनलमध्ये उतरण्याच्या काही तास आधी तिचं वजन ५० किलोपेक्षा जास्त असल्याचं आढळून आलं.
विनेश फोगट बऱ्याच काळापासून ५३ किलो वजनी गटात खेळत आहे. टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये तिनं ५३ किलो वजनी गटात भाग घेतला होता, परंतु पॅरिस ऑलिम्पिकसाठी ती ५० किलो वजनी गटासाठी पात्र ठरली. ५३ किलो वजनी गटात तिला आपल्या ज्युनिअरकडून पराभव पत्करावा लागला आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपही खेळली नाही, त्यामुळं तिला त्या गटात स्थान मिळालं नव्हतं.