मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Bishan Singh Bedi:क्रिकेट रसिकांना भावूक करणारा क्षण; ५० वर्षांपूर्वीचे मित्र भेटले, हसले आणि रडलेही

Bishan Singh Bedi:क्रिकेट रसिकांना भावूक करणारा क्षण; ५० वर्षांपूर्वीचे मित्र भेटले, हसले आणि रडलेही

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Oct 06, 2022 09:46 PM IST

Bishan Singh Bedi Meets Pakistani Friend Intikhab Alam: भारताचे महान फिरकीपटू बिशनसिंग बेदी आणि पाकिस्तानचे माजी कर्णधार इंतिखाब आलम यांची करतारपूर येथे भेट झाली. या भेटीत दोघांनी आपल्या जुन्या आठवणीना उजाळा दिला. यावेळी दोघांचेही डोळे पाणावले होते.

Bishan Singh Bedi Meets Intikhab Alam
Bishan Singh Bedi Meets Intikhab Alam

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि महान फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांनी पाकिस्तानचे माजी कर्णधार इंतिखाब आलम यांची करतारपूरमध्ये भेट घेतली. कर्तापूरला पोहोचलेल्या बिशन सिंह बेदी यांनी इंतिखाब आलम यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर जेव्हा ही माहिती इंतिखाब आलम यांच्यापर्यंत पोहोचली, तेव्हा ते त्यांना भेटण्यासाठी लाहोरहून करतारपूरला पोहोचले. दोन क्रिकेटपटू मित्र एकमेकांना भेटण्यासाठी इतके उत्सुक होते, की इंतिखाब आलम यांनी आपल्या जुन्या मित्राला भेटण्यासाठी १४० किलोमीटरचा प्रवास केला. आलम हे ८० वर्षांचे आहेत.

पाकिस्तानी पत्रकाराने या भेटीचा फोटो ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये बिशन सिंग बेदी हे इंतिखाब आलम आणि त्यांच्या कुटुंबीयांसह दिसत आहेत. यावेळी बिशन सिंग बेदी आणि आलम या दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे वेगवेगळे भाव दिसत आहेत.

२०१९ मध्ये करतारपूर कॉरिडॉर सुरु झाल्यानंतर ७६ वर्षीय बेदींनी कर्तारपूर साहिब येथे माथा टेकण्यााची इच्छा व्यक्त केली होती. पण कोरोना आणि प्रकृती अस्वस्थामुळे ते शक्य झाले नाही. मात्र, अखेर मंगळवारी बेदी हे कर्तारपूरला पोहोचले. यावेळी त्यांची पत्नी अंजू आणि परिवारातील काही सदस्य सोबत होते. बिशन हे बरे आहेत, पण ते नियमित प्रवास करू शकत नाही, असे अंजू यांनी सांगितले.

या भेटीनंतर इंतिखाब आलम काय म्हणाले

तर इंतिखाब आलम यांनी या भेटीनंतर सांगितले की, 'माझी आणि बिशनची मैत्री ५० वर्ष जुनी आहे. त्याला पाहून खूप छान वाटलं. पण त्याला व्हीलचेअरवर पाहून आनंद झाला नाही, परंतु सुदैवाने तो वेगाने बरा होत आहे. मी त्याला २०१३ मध्ये कोलकाता येथे शेवटचे भेटलो होतो, पण आम्ही फोनवरून संपर्कात होतो.

सोबतच ते पुढे म्हणाले की, करतारपूर साहिबमध्ये आपण भेटू असे मला वाटलेही नव्हते. आम्हा दोघांसाठी हा खूप भावनिक क्षण होता. आम्ही जुन्या आठवणींना उजाळा. यावेळी आमचे डोळेदेखील पाणावले होते. पण आम्ही पंजाबी असल्याने मग हसायला आणि मस्करी करायला सुरुवात केली.

आलम यांचा जन्म पंजाबमधील होशियारपूर येथे झाला. ते भारताच्या पंजाब संघाचे प्रशिक्षकही होते. या भेटीनंतर दोघांच्या कुटुंबीयांनी करतारपूरमध्ये एकत्र लंगरचा आस्वादही घेतला.

इंतिखाब आलम यांचे करिअर

इंतिखाब आलम हे पाकिस्तान क्रिकेट संघाचे कर्णधार होते. इंतिखाब यांनी पाकिस्तानसाठी ४७ कसोटी सामने आणि ४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांनी १९६९ ते १९७५ या कालावधीत १७ कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व केले. तर ४ एकदिवसीय सामन्यांमध्येही ते पाकिस्तानचे कर्णधारपद होते.

बिशनसिंग बेदी यांचे करिअर

बिशनसिंग बेदी हे आपल्या काळातील सर्वोत्तम डावखुरे फिरकी गोलंदाज आहेत. डावखुरे बेदींनी ६७ कसोटी सामन्यात २६६ विकेट घेतल्या. बेदी हे भारताची फिरकी चौकडी इरापल्ली प्रसन्ना, श्रीनिवास वेंकटराघव आणि भागवत चंद्रशेखर यांचा भाग होते.

WhatsApp channel

संबंधित बातम्या