
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने चार षटकांत २६ धावा देत ४ बळी घेतले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आतापर्यंतच्या सर्व T20 सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजाचा हा सर्वोत्तम स्पेल होता, भुवनेश्वर कुमारने बाबर आझमला बाद करुन पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का दिला होता.
भुवीने प्रथम पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला बाद केले, ज्यातून पाकिस्तान सावरू शकला नाही. याशिवाय आसिफ अली, शादाब खान आणि नसीम शाह यांनाही भुवीने तंबूत पाठवले.
भुवनेश्वर कुमारसाठी गेली एक-दोन वर्षे फारशी चांगली गेली नाहीत. कारण या काळात तो दुखापतग्रस्त झाला होता आणि त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले होते. क्रिकेटशिवाय त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही भूकंप आला, कारण त्याच्या वडिलांचेही याच काळात निधन झाले.
भुवनेश्वर कुमारला आयपीएल २०२० दरम्यान दुखापत झाली होती, ज्यामुळे तो संपूर्ण सीझन योग्य प्रकारे खेळू शकला नाही. यानंतर तो काही काळ क्रिकेटपासून दूर राहिला, तसेच, फॉर्ममध्ये नसल्यामुळे तो टी-20 संघातूनही बाहेर झाला होता.
यानंतर भुवनेश्वर कुमारचे वडील किरण पाल सिंग यांचे IPL २०२१ दरम्यान निधन झाले. ते यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत होते. नोएडामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. वडिलांच्या उपचारासाठी त्याने आयपीएलदेखील मध्येच सोडले होते.
भुवनेश्वर कुमारसाठी आयपीएल २०२१ चांगले गेले नाही. त्या मोसमात तो ११ डावात केवळ ६ विकेट घेऊ शकला. अशा परिस्थितीत त्याच्या टी-20 क्रिकेटमधील भविष्यावर प्रश्न निर्माण होऊ लागले होते. मात्र यानंतर भुवनेश्वरने दमदार पुनरागमन केले.
आयपीएल २०२२ मध्ये त्याने १२ विकेट घेतल्या, पण त्याच्या गोलंदाजीत बरीच सुधारणा झाली होती. सुरुवातीला विकेट मिळवून देणारा भुवी डेथ ओव्हर स्पेशालिस्ट देखील बनला. अशा परिस्थितीत त्याने टीम इंडियातही पुनरागमन केले. तसेच, पुनरागमन केल्यापासून त्याने भारतीय गोलंदाजांमध्ये वर्चस्व गाजवले आहे.
मार्च २०२१ पासून भुवीने २९ T20 डावांमध्ये एकूण ३६ विकेट घेतल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी उत्कृष्ट राहिली आहे. भुवनेश्वर कुमार ज्याप्रकारे टी-20 मध्ये शानदार कामगिरी करत आहे, हे पाहून त्याचा टी-20 विश्वचषकासाठीचा दावा मजबूत होत आहे. जसप्रीत बुमराह परतल्यावर या दोघांची जोडी विरोधकांसाठी कर्दनकाळ बनू शकते.






