Bhuvneshwar Kumar Team India : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. भुवनेश्वरने नोव्हेंबर २०२२ मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. यानंतर तो टीम इंडियात पुनरागमन करू शकला नाही. भुवनेश्वरने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या बायोमध्ये बदल केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे.
वास्तविक, भुवनेश्वर कुमारने इंस्टाग्राम अकाऊंटच्या बायोमधून इंडियन क्रिकेटर हा शब्द हटवला आहे. त्याऐवजी त्याने फक्त भारतीय असे लिहिले आहे. भुवनेश्वरचा हा बदल चर्चेत आला आहे. ट्विटरवर अनेक यूजर्सनी भुवीच्या निवृत्तीबद्दल ट्विट केले आहे. मात्र, याबाबत भुवनेश्वरकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
भुवी आता ३३ वर्षांचा आहे. पण तो जानेवारी २०२२ नंतर भारताच्या वनडे संघात परतला नाही. तसेच, भुवीने त्याची शेवटची कसोटी जानेवारी २०१८ मध्ये खेळली होती.
विशेष म्हणजे, भुवनेश्वर हा काही काळापासून टीम इंडियाचा सर्वात महत्त्वाचा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत २१ कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने ६३ बळी घेतले आहेत. यादरम्यान त्याची एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी ९६ धावांत ८ बळी अशी आहे. भुवनेश्वरने १२१ वनडेत १४१ विकेट घेतल्या आहेत. त्याने ८७ टी-20 सामन्यात ९० विकेट घेतल्या आहेत. भुवनेश्वरने इंडियन प्रीमियर लीगमध्येही प्रभावी कामगिरी केली आहे. त्याने आयपीएलच्या १६० सामन्यात १७० विकेट घेतल्या आहेत.
संबंधित बातम्या