पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या खेळाडूंनी आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यंत १५ पदकांची कमाई केली. यात तीन सुवर्णपदकांचा समावेश आहे. दरम्यान, आजही भारताला सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती, पण ती थोडक्यात हुकली.
वास्तविक, आज मराठमोळ्या भाग्यश्री जाधव हिच्यावर सर्वांच्या नजरा होत्या. ती आज गोळा फेकमध्ये पदकासाठी मैदानात उतरणार होती. भाग्यश्रीने सुरुवात दमदार केली, तिला पदक जिंकता आले नाही. भाग्यश्रीला पदक जिंकता आले नाही, पण तिने कोट्यवधी लोकांची मने मात्र नक्कीच जिंकली आहेत.
पॅरा गोळा फेकमध्ये चीनच्या लि जुआनने ९.१४ मीटर लांब गोळा फेकत सुवर्णपदक जिंकले. तर पोलंडच्या लुसिना कोर्नोबिसने ८.३३ मीटर लांब गोळा फेकत रौप्यपदकाची कमाई केली. यानंतर कांस्य पदकावर मोरोक्कोच्या सईदा अमौडी हिने नाव कोरले. तिने ७.८० मीटर लांब गोळा फेकला .
भाग्यश्री जाधव ही मूळची नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील आहे. भाग्यश्रीच्या नशिबी लहानपणापासून प्रत्येक गोष्टीत संघर्ष आला आहे. तिचे वडील मतिमंद असल्यामुळे तिला काकांनी सांभाळले. तिचे लग्न करून दिले. पण लग्नानंतर तिच्यावर विषप्रयोग करण्यात आला. त्यामुळे ती कोमात गेली. अशा परिस्थितीत तिला कायमचे अपंगत्व आले. पण तिने हार मानली नाही. भाग्यश्री संघर्ष करत पॅरिसमधील पॅरालिम्पिकपर्यंत पोहोचली.
चीनमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने दोन कांस्यपदकांची कमाई केली होती. त्यामुळे तिला थेट पॅरिस पॅरालिम्पिकचे तिकिट मिळाले.
तत्पूर्वी, भाग्यश्रीचा या खेळातील प्रवास २०१७ मध्ये सुरू झाला आणि तिने लवकरच FEZA वर्ल्ड कप आणि वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स गेम्ससह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकून आपला ठसा उमटवला.
यापूर्वीही तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. तिने २०२२ आशियाई पॅरा गेम्समध्ये शॉटपुट F34 प्रकारात रौप्य पदक जिंकले आणि टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सातवे स्थान पटकावले.
टोकियो पॅरालिम्पिकमध्येही भारताने अप्रतिम कामगिरी केली होती. ५४ खेळाडूंनी भारतासाठी १९ पदके जिंकली होती. यामध्ये ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्य पदके जिंकली.