प्रो कबड्डी लीगच्या ११व्या हंगामातील ३१व्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने हरियाणा स्टीलर्सचा ४०-३८ असा पराभव केला. विशेष म्हणजे, बंगाल वॉरियर्सने सातव्या सीझननंतर पहिल्यांदाच बंगालचा पराभव केला आहे. अशा प्रकारे त्यांनी ५ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे.
अनुभवी रेडर मनिंदर सिंग याने बंगालसाठी चमकदार कामगिरी केली आणि या मोसमातील पहिला सुपर-१० लगावला. त्याने एकूण १२ गुण मिळवले. तर कर्णधार फजल अत्राचली याने बचावात चमकदार कामगिरी करत ४ गुण कमावले.
दुसरीकडे, हरियाणा स्टीलर्सकडून मोहम्मदरेझा शादलू याने शानदार खेळ करत ९ गुण मिळवले, परंतु त्याला इतर खेळाडूंकडून फारशी साथ मिळाली नाही.
हरियाणा स्टीलर्सने जबरदस्त सुरुवात केली. पहिल्या १० मिनिटांत हरियाणाचा संघ बऱ्यापैकी वरचढ होता. हरियाणासाठी रेडर्स चमकदार कामगिरी करत होते आणि बचावफळीही त्यांना चांगली साथ देत होती. मात्र, १० मिनिटांनी बंगाल वॉरियर्सने पुनरागमन केले.
मणिंदर सिंगने रेड टाकताना गुण मिळवले आणि डिफेंडर्सनीही आपले काम चोख केले. त्यामुळे सामना पूर्णपणे बरोबरीचा झाला. हरियाणा स्टीलर्स संघ आपली आघाडी कायम राखू शकला नाही.
बंगालने उत्तरार्धापूर्वी हरियाणा स्टीलर्सला ऑलआऊट करत आघाडी मिळवून दिली. मात्र, यानंतर हरियाणाने सामना बरोबरीत आणला आणि गुणसंख्या १९-१९ अशी बरोबरी झाली. बंगाल वॉरियर्सकडून मनिंदर सिंगने चमकदार कामगिरी केली.
उत्तरार्धाच्या सुरुवातीलाच बंगाल वॉरियर्सने सुपर टॅकलद्वारे दोन गुण मिळवले आणि दोन गुणांची आघाडीही घेतली. यानंतर बंगालने हळूहळू आपली आघाडी मजबूत करण्यास सुरुवात केली. मनिंदर सिंग शानदार खेळ करत होता आणि त्यामुळे बंगाल सातत्याने गुण घेत होता. मनिंदर सिंगने या मोसमातील पहिला सुपर-१० लगावला.
दुसरीकडे, विनय हरियाणा स्टीलर्ससाठी चांगली कामगिरी करत होता परंतु त्याला इतर रेडर्सकडून चांगली साथ मिळत नव्हती. नवीननेही गुण मिळवण्यास सुरुवात केली होती, पण बंगालची आघाडी अबाधित राहिली. सामन्याला शेवटची अडीच मिनिटे बाकी असताना हरियाणा स्टीलर्स संघ पुन्हा एकदा ऑलआऊट झाला आणि येथूनच त्यांचा पराभव निश्चित झाला.