मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ben Stokes : जिंकलस भावा! निवृत्तीचं कारण वाचून तुम्हीही स्टोक्सचं कौतुक कराल

Ben Stokes : जिंकलस भावा! निवृत्तीचं कारण वाचून तुम्हीही स्टोक्सचं कौतुक कराल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 18, 2022 06:51 PM IST

स्टोक्स मंगळवारी त्याच्या वनडे कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे. मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंड ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे.

Ben Stokes
Ben Stokes

इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. स्टोक्सने सोमवारी ही घोषणा केली. स्टोक्स मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध  त्याच्या वनडे कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करुन ही माहिती दिली आहे.

यावेळी स्टोक्सने लिहिले आहे की,  “मला आता तिन्ही फॉरमॅट खेळणे शक्य नाही. माझ्यावरील भार थोडासा हलका करण्यासाठी मी वनडेतून निवृत्तीचा निर्णय घेत आहे. तसेच, मला असे वाटते की मी दुसऱ्या खेळाडूची जागा घेत आहे. माझ्यामुळे इतर युवा खेळाडू संघाबाहेर बसू नयेत”, यासाठी मी हा निर्णय घेत असल्याचे स्टोक्सने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे. 

मात्र, स्टोक्स कसोटी आणि टी-२० सामने खेळत राहणार आहे. यंदा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकातही त्याचा इंग्लंड संघात समावेश होऊ शकतो. स्टोक्स हा कसोटीत इंग्लंडचा कर्णधार आहे.

निवृत्तीची घोषणा करताना स्टोक्स काय म्हणाला-

सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा करताना स्टोक्स म्हणाला की, ‘यापुढे एकदिवसीय सामन्यांमध्ये मी माझे १०० टक्के देऊ शकत नाही. तसेच, अनेक युवा खेळाडू आपल्यामुळे बाहेर बसून नये. स्टोक्सने लिहिले ‘मला आता तिन्ही फॉरमॅट खेळणे शक्य नाही. विशेषत: वेळापत्रक आणि आमच्याकडून अपेक्षित कामगिरी पाहता ते खूप थकवा देणारे आहे. माझे शरीर मला निराश करत आहे, मला असे वाटते की मी दुसऱ्या खेळाडूची जागा घेत आहे. त्यामुळे आता आणखी एका क्रिकेटपटूची क्रिकेटमध्ये पुढे जाण्याची वेळ आली आहे’.

सोबतच, ‘आता मी माझे सर्व लक्ष कसोटी क्रिकेटवर केंद्रित करणार आहे. मला वाटते की, या निर्णयामुळे मी पूर्ण निष्ठेने टी-२० फॉरमॅट खेळू शकेन. मी, जोस बटलर, मॅथ्यू पॉट, सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला पुढील यशासाठी शुभेच्छा देतो. गेल्या सात वर्षांत आम्ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये बरीच प्रगती केली आहे . आमचे भविष्यही उज्ज्वल दिसत आहे’, असेही स्टोक्स म्हणाला.

स्टोक्सने पुढे लिहिले आहे की, ‘मी आतापर्यंत १०४ सामने खेळले आहेत, ते सर्व माझ्या कायम स्मरणात राहतील. मला अजून एक सामना खेळायचा आहे आणि माझा शेवटचा सामना माझ्या घरच्या मैदानावर, डरहमवर खेळणार आहे. नेहमीप्रमाणे इंग्लंडचे चाहते प्रत्येक वेळी माझ्यासोबत होते आणि यापुढेही राहतील. तुम्ही जगातील सर्वोत्तम चाहते आहात. मला आशा आहे, की आम्ही मंगळवारी जिंकू आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका शानदार शैलीत सुरू करू’.

२०१९ वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग-

स्टोक्सने २०१९ मध्ये इंग्लंड संघासोबत एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये त्याच्या बॅटमुळे ओव्हरथ्रोचा चौकार गेला होता. शेवटी हा चौकारच इंग्लंडच्या विजयाचे कारण ठरला होता. अलीकडेच स्टोक्स कसोटी संघाचा कर्णधार झाला आहे.

स्टोक्सची आतापर्यंतची वनडे कारकीर्द-

३१ वर्षीय स्टोक्सने आतापर्यंत १०४ एकदिवसीय सामन्यांच्या ८९ डावांमध्ये २९१९ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३९.४५ आणि स्ट्राइक रेट ९५.२७ इतका राहिला आहे. एकदिवसीय सामन्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या १०२ आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने ३ शतके आणि २१ अर्धशतके झळकावली आहेत.

त्याचबरोबर गोलंदाजीत त्याने ८७ डावात ७४ बळी घेतले आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट ६.०३ एवढा राहिला आहे. गोलंदाजीत त्याची सर्वोत्तम कामगिरी ६१ धावांत ५ विकेट अशी आहे.

WhatsApp channel