मराठी बातम्या  /  क्रीडा  /  BCCI ने लाज आणली! जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाकडे DRS साठी पैसे नाहीत

BCCI ने लाज आणली! जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाकडे DRS साठी पैसे नाहीत

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 23, 2022 03:08 PM IST

मध्यप्रदेशचा गोलंदाज गौरव यादवने मुंबईच्या (mumbai ranji trophy) सर्फराज खान विरुद्ध पायचीतचे अपील केले. मात्र, पंचांनी ते फेटाळून लावले. यानंतर रिप्लेत सर्फराज खान बाद असल्याचे दिसत होते.

DRS
DRS

रणजी ट्रॉफी २०२२ मधील अंतिम सामना मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात सुरु आहे. बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान नव्या वादाला तोंड फुटले आहे. या स्पर्धेतील सर्वात महत्वाच्या सामन्यासाठी डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम म्हणजेच डीआरएस उपलब्ध नाही. त्यामुळे मध्य प्रदेशच्या संधाला मोठा फटका बसला.

मध्यप्रदेशचा गोलंदाज गौरव यादवने मुंबईच्या सर्फराज खान विरुद्ध पायचीतचे अपील केले. मात्र, पंचांनी ते फेटाळून लावले. यानंतर रिप्लेत सर्फराज खान बाद असल्याचे दिसत होते. सर्फराज खानने पहिल्या डावात शतक झळकावले आहे. त्यामुळे मध्य प्रदेशला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

फायनलसारख्या सामन्यात डीआरएस उपलब्ध नसणे, ही खूपच लाजिरवाणी बाब आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेले BCCI निशाण्यावर आले आहे.

‘डीआरएस सिस्टीमचे तंत्रज्ञान हे खूप महाग आहे. त्यामुळे त्याचा वापर सामन्यात केला गेला नाही’, असे स्पष्टीकरण आयोजकांकडून देण्यात आले आहे.

दरम्यान, रणजी ट्रॉफीमध्ये यापूर्वी बीसीसीआयने डीआरएस दिलेला नाही, असेही नाही. रणजी ट्रॉफी २०१९-२० च्या सेमीफायनल आणि फायनल दरम्यान बोर्डाने 'मर्यादित स्वरुपात DRS' चा वापरला होता.

डीआरएसच्या वापरावरुन बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आमच्या अम्पायर्सवर आमचा विश्वास आहे".

सोबतच, यावर भारताच्या एका माजी क्रिकेटपटूने म्हटले आहे की, "डीआरएस खूप महागडे आहे, खर्च खूप वाढतो. अंतिम फेरीत डीआरएस नसल्यास काय फरक पडतो. पंचांवर विश्वास ठेवण्याची हीच वेळ आहे. भारताचे दोन सर्वोत्तम पंच के.एन. अनंतपद्मनाभन आणि वीरेंद्र शर्मा हे या सामन्यात काम पाहत आहेत. तसेच, फायनलमध्ये आज डीआएस वापरले तर तुम्ही म्हणाल साखळी सामन्यातही याचा वापर व्हायला हवा".

बीसीसीआयच्या या प्रतिक्रियेवर काही जणांनी म्हटले आहे की, "डीआरएस वापरणे महाग आहे, असे म्हणणे हे खूपच बालिशपणाचे विधान वाटते, कारण बोर्डाने अलीकडेच आयपीएलच्या मीडिया हक्कांमधून जवळपास ५० हजार कोटींची कमाई केली आहे. अशा परिस्थितीत रणजी करंडक स्पर्धेच्या किमान उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम सामन्यामध्ये डीआरएसचा वापर केला पाहिजे, जिथे एक चुकीचा निर्णय सामन्याचा निकाल पालटू शकतो".

या विषयी आणखी एका सुत्राने सांगितले की, 'डीआरएसच्या उपकरणांची (वायरिंग आणि डिरिगिंग करणे) ने-आण करणे खूप खर्चिक आहे. हॉक आय म्हणजे तुम्हाला अजून जास्त कॅमेऱ्यांची गरज लागेल. रणजी ट्रॉफी ही मर्यादित साधनांवर खेळली जाते. त्यावर अनेक जण म्हणतात की ज्या सामन्यांचे प्रक्षेपण होत आहे त्या सामन्यात तरी डीआरएस वापरावे. मात्र मर्यादित डीआरएस तुम्ही वापरू शकत नाही. गेल्यावेळी याचा वापर फक्त मर्यादित रिप्लेसाठी झाला. तेही एज आहे का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला बॉल ट्रॅजेक्टरी वापरता येत नाही आणि हेच तंत्रज्ञान डीआरएसमधील सर्वात महत्वाचे तंत्रज्ञान आहे.'

WhatsApp channel

संबंधित बातम्या