मराठी बातम्या  /  क्रीडा  /  स्पॉन्सर शोधावा लागणार? बायजू अन् स्टार स्पोर्ट्सने वाढवलं BCCI चं टेन्शन, नेमकं प्रकरण काय? पाहा

स्पॉन्सर शोधावा लागणार? बायजू अन् स्टार स्पोर्ट्सने वाढवलं BCCI चं टेन्शन, नेमकं प्रकरण काय? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 09, 2023 08:35 PM IST

Indian Cricket Team Jersey, Byjus: बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत बायजू आणि स्टार स्पोर्ट्सच्या मुद्द्यांवर सुमारे १ तास चर्चा झाली. यासोबतच बीसीसीआय बायजू आणि स्टार स्पोर्ट्सच्या मुद्द्यांवर गांभीर्याने विचार करत आहे.

Indian Cricket Team Jersey sponser
Indian Cricket Team Jersey sponser

भारतीय क्रिकेट बोर्डाला आगामी काळात नवा जर्सी स्पॉन्सर शोधावा लागणार आहेत. कारण बायजूने (Byjus) आपला करार संपवण्याचा निर्णय जवळपास घेतला आहे. त्यांनी BCCI ला १४० कोटी रुपयांची बँक गॅरंटी जमा करण्यास सांगितले आहे. तसेच उर्वरित १६० कोटी रुपये हप्त्याने भरणार असल्याचे सांगितले. बायजूने बीसीसीआयला आधीच सांगितले होते की त्यांना आपला करार संपवायचा आहे.

पण बीसीसीआयने डिसेंबर २०२२ मध्ये त्यांना मार्च २०२३ पर्यंत जर्सी स्पॉन्सर राहावे असे सांगितले होते. त्याच वेळी, भारतीय क्रिकेटचे मीडिया हक्क असलेल्या स्टार इंडियानेही आपल्या जुन्या करारात १३० कोटी रुपयांची सूट मागितली आहे. मात्र ही सवलत का मागितली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या दोन्ही मुद्द्यांवर आज (९ जानेवारी) बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेची (BCCI Apex Council Meeting) तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. यावर सुमारे तासभर चर्चा झाली. बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, "बैठकीत फक्त बायजू आणि स्टार इंडियाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली पण त्यालाही एक तास लागला." कोट्यवधी रुपयांची बाब असल्याने वेळ लागणे स्वाभाविक होते. अलीकडच्या काळात बायजू आर्थिक संकटातून जात आहे. अलीकडेच त्यांनी मोठी कर्मचारी कपातदेखील केली होती.

बायजू हे फिफा विश्वचषकाचेही स्पॉन्सर होते. जून २०२२ मध्ये, त्यांनी BCCI सोबतचा जर्सी प्रायोजकत्वाचा करार नोव्हेंबर २०२३ पर्यंत वाढवला. हा करार सुमारे ३५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे २८८ कोटी रुपयांचा होता.

स्टार इंडियाचे प्रकरण काय आहे

त्याचवेळी स्टार इंडियानेही आपल्या जुन्या डीलबाबत दिलासा मागितला आहे. स्टारने २०१८ ते २०२३ या कालावधीत बीसीसीआयला ६१३८.१ कोटी रुपये दिले आहेत. भारताच्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट सामन्यांच्या प्रसारणासाठी स्टारने ही रक्कम दिली आहे. या सामन्यांच्या प्रसारणासाठी झालेल्या डीलमध्ये १३० कोटी रुपयांची सूट मागितली आहे.

BCCI लवकरच भारताच्या आगामी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामन्यांच्या प्रसारणासाठी ५ वर्षांसाठी मीडिया हक्क विकणार आहे. सध्याचा करार मार्च २०२३ मध्ये संपणार आहे.

WhatsApp channel