काही दिवसांपूर्वीच एका चिनी खेळाडूचा बॅडमिंटन कोर्टवर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता, आता असेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. यावेळी बांगलादेशच्या अव्वल बुद्धिबळ ग्रँडमास्टरचा खेळादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
बांगलादेशचे सर्वात प्रसिद्ध बुद्धिबळ ग्रँडमास्टर झियाउर रहमान यांचे वयाच्या ५० व्या वर्षी शुक्रवारी(५ जुलै) निधन झाले. बांगलादेशात एका राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान सामना खेळत असताना झियाउर रहमान यांचा मृत्यू झाला.
बांगलादेश राष्ट्रीय स्पर्धेतील सामन्यादरम्यान झियाउर रहमान यांना झटका आला आणि तो बोर्डवरच बेशुद्ध पडले. बांगलादेश बुद्धिबळ महासंघाचे सरचिटणीस शहाब उद्दीन शमीम यांनी एएफपीला सांगितले की, झियाउर त्यांच्या १२ फेरीच्या सामन्यात सहकारी ग्रँडमास्टर इनामुल हुसेनविरुद्ध खेळत होते. ते अचानक बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना तातडीने ढाका येथील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
तर विरोधी खेळाडू एनामुल हुसेन यांनी सांगितले की, झियाउर यांना पक्षाघाताचा झटका आला आहे हे समजण्यासाठी त्यांना काही सेकंद लागले. इनामूल म्हणाला, "तो खेळत होता, त्यामुळे तो आजारी आहे असे अजिबात वाटत नव्हते. त्यावेळी माझी पाळी होती. तो पडला तेव्हा मला वाटले की तो पाण्याची बाटली घेण्यासाठी वाकतोय. पण नंतर तो बेशुद्ध झाला. “आम्ही त्याला दवाखान्यात नेले. त्याचा मुलगा त्याच्या शेजारील टेबलावर खेळत होता.”
अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष नितीन नारंग म्हणाले- "बांगलादेश राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिपदरम्यान बांगलादेशी ग्रँडमास्टर झियाउर रहमान यांचे आकस्मिक निधन ऐकून खूप दुःख झाले. ते एक आदरणीय व्यक्ती होते आणि ते भारतीय स्पर्धांमध्ये सतत सहभागी होत होते. त्यांचे कुटुंब, मित्र आणि बांगलादेशातील संपूर्ण बुद्धिबळ समुदायाप्रती संवेदना, त्यांचा वारसा येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल.”
संबंधित बातम्या