मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Babar Azam: ‘ही तर धोनीची स्टाईल’! बाबर आझमनं घेतली पत्रकाराची फिरकी

Babar Azam: ‘ही तर धोनीची स्टाईल’! बाबर आझमनं घेतली पत्रकाराची फिरकी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 11, 2022 06:10 PM IST

Babar Azam Trolled Journalist: बाबर आझमप्रमाणे असाच काहीसा प्रसंग २०१६ मध्ये टीम इंडियाचा तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनीसोबत घडला होता. एका परदेशी पत्रकाराने धोनीला निवृत्ती घेणार का? असा प्रश्न केला होता. त्यावेळी धोनीने त्या पत्रकाराला जवळ बोलवून त्याला निरुत्तर केले होते.

ms dhoni
ms dhoni

क्रिकेटमधील वर्कलोड मॅनेजमेंट ही जगभरातील सर्व खेळाडूंसाठी एक मोठी समस्या बनली आहे. इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने व्यस्त वेळापत्रकामुळेच अचानक एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. तर आता दोन दिवसांपूर्वी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टनेही न्युझीलंड क्रिकेटसोबतच्या केंद्रीय करारातून आपले नाव काढून घेत सर्वांना आश्चर्यचकित केले.

अशात आता पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला सततच्या क्रिकेटबाबत प्रश्र विचारण्यात आला. तेव्हा त्याने भन्नाट उत्तर दिले. तसेच, प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराची बोलतीही बंद केली.

पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?

पाकिस्तान संघाला आशिया चषक २०२२ पूर्वी नेदरलँड्सच्या दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने बाबर आझम याला विचारले की, 'वर्कलोड जास्त आहे ना?'

यावर उत्तर देताना बाबर म्हणाला, ‘तुम्ही जे काय विचारताय, त्याचं उत्तर फिटनेस आहे. सर्व तुमच्या फिटनेसवर अवलंबून आहे. आमची फिटनेस चांगली असल्याने आम्ही त्याचा कधीच जास्त विचार केला नाही’.

या सोबतच बाबरने पत्रकारालाच प्रतिप्रश्न करत त्याची बोलती बंद केली. “तुम्हाला काय वाटते की मी म्हातारा झालोय?, की आमचा संघ म्हातारा झालाय? कामाचा ताण वाढत असेल तर त्यासाठी जास्त फिट राहावे लागेल. त्यावर आम्ही काम करत आहोत”, असेही बाबर म्हणाला.

धोनीसोबत घडला असाच प्रसंग

दरम्यान, असाच काहीसा प्रसंग २०१६ मध्ये टीम इंडियाचा तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनीसोबत घडला होता. एका परदेशी पत्रकाराने धोनीला निवृत्ती घेणार का? असा प्रश्न केला होता. त्यावेळी धोनीने त्या पत्रकाराला जवळ बोलवून त्याला निरुत्तर केले होते.

बाबर वनडे - टी-२० मध्ये नंबर वन-

बाबर आझम सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. बाबर टी-20 आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रमवारीत नंबर वन आहे. तर कसोटी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. सध्याच्या तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये बाबरचा समावेश आहे. या महिन्याच्या अखेरीस २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.

WhatsApp channel