मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Axar Patel ची वादळी खेळी, धोनीचा १७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
Axar Patel
Axar Patel

Axar Patel ची वादळी खेळी, धोनीचा १७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

25 July 2022, 12:39 ISTRohit Bibhishan Jetnavare

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला वेस्ट इंडिजकडून ३१२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. जे टीम इंडियाने शेवटच्या षटकात पूर्ण केले. अष्टपैलू अक्षर पटेलने धडाकेबाज खेळी केली. अक्षर पटेलने त्याच्या खेळीत ५ षटकार लगावले.

टीम इंडियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा २ गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने अप्रतिम कामगिरी केली. त्याच्या फलंदाजीच्या बळावरच भारताने हरलेला सामना जिंकला.

ट्रेंडिंग न्यूज

सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अक्षर पटेलने अवघ्या ३५ चेंडूत ६४ धावा केल्या. यामध्ये त्याने ३ चौकार ५ षटकार खेचले. अक्षर पटेलने १८२ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. अवघ्या ३३ चेंडूत अक्षर पटेलने दीपक हुडासोबत ५१ धावांची भागीदारी केली.

शेवटच्या १० षटकात भारताला विजयासाठी १०० धावांची गरज होती. मात्र, अक्षर पटेलच्या या धमाकेदार खेळीमुळे टीम इंडियाचा विजय सोपा झाला. टीम इंडियाला शेवटच्या षटकात ८ धावांची गरज होती. अक्षर पटेलने षटकार मारून सामना जिंकवला.

अक्षर पटेलने मोडला धोनीचा विक्रम -

अक्षर पटेलने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा एक मोठा विक्रमही मोडला आहे. अक्षर हा सातव्या क्रमांकावर फलंदाजीस आला होता. तो आता भारतासाठी सातव्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. अक्षर पटेलने त्याच्या डावात ५ षटकार ठोकले आहेत.

त्याच्या आधी हा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर होता. धोनीने २००५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध या क्रमांकावर फलंदाजी करताना ३ षटकार ठोकले होते. त्याच्याशिवाय युसूफ पठाणनेही २०११ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडविरुद्ध आव्हानाचा पाठलाग करताना ३ षटकार ठोकले होते.

शेवटच्या १० षटकात सर्वाधिका धावा चेस करुन सामना जिंकला-

टीम इंडियाने शेवटच्या १० षटकात १०० धावा चेस करुन सामना जिंकला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये शेवटच्या १० षटकांमध्ये सर्वाधिक धावा चेस करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. पाकिस्तानने शेवटच्या १० षटकांमध्ये १०९ धावा करून बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकला होता. आता या यादीत भारताचे नावही सामील झाले आहे. भारताने याआधी २०१५ च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध शेवटच्या १० षटकांत ९१  धावा केल्या होत्या.