पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय धावपटू अविनाश साबळे पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस इव्हेंटच्या अंतिम फेरीत ११व्या स्थानावर राहिला. या शर्यतीनंतर त्याने भारतीय खेळाडूंची खिल्ली उडवणाऱ्या टीकाकारांना चांगलेच फैलावर घेतले.
साबळे म्हणाला की, भारताच्या स्टार खेळाडूंना जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवण्यास वेळ लागेल. पण सोशल मीडियावर काही लोक आपल्या खेळाडूंविरोधात अपमानास्पद लिखाण करत आहेत. हे पाहून खूप वाईट वाटते. आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटू आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी येथे आले आहेत आणि लोक त्यांची खिल्ली उडवत आहेत.
अविनाश पुढे म्हणाला, मी पाहिले की काही खेळाडू माझ्या शेजारी बसून हे सर्व वाचत होते आणि निराश होत होते. एवढी खिल्ली उडवली तर देशाचे प्रतिनिधित्व कसे करणार असा प्रश्न त्यांना पडला होता.
आपले खेळाडू येथे नेहमी शेवटी येतात, काही जिंकत नाहीत, असे काही लोक म्हणत आहेत. पण आपण हे विसरता कामा नये की येथे आपण जगातील सर्वोत्तम खेळाडूंशी स्पर्धा करत आहोत आणि आपले खेळाडू मेहनत घेत आहेत.
परदेशात प्रशिक्षण घेणे सोपे नाही. काही लोकांना वाटते की आपण सरकारी पैशावर मजा करायला येतो, पण तसे अजिबात नाही. गेल्या ४-५ महिन्यांपासून मी माझे कुटुंब आणि मित्रांपासून दूर प्रशिक्षण घेत आहे आणि मला माहित आहे की ते किती कठीण आहे. मध्यरात्री मैदानातून परतल्यानंतर जेवण स्वतःच शिजवावे लागते.
मी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये कोलोरॅडो स्प्रिंग्स, यूएसए येथे प्रशिक्षण घेत होतो जेथे तापमान शून्य अंशांपेक्षा कमी होते. उंची आणि चांगल्या सुविधांमुळे आम्ही तिथे प्रशिक्षण घेतो. याशिवाय लांब पल्ल्याच्या रनिंगसाठी योग्य गटही सापडतो."
यापूर्वी, अविनाश साबळे याने गेल्या महिन्यात पॅरिसमध्ये ८:०९.९१ ही वैयक्तिक सर्वोत्तम वेळ सेट केली होती. बुधवारी रात्री झालेल्या शर्यतीबाबत बोलताना तो म्हणाला की, ही शर्यत शेवटच्या टप्प्यापर्यंत सुरू राहिली. 'यावेळी मी पूर्णपणे तयार होतो आणि मला माझ्या कामगिरीवर पूर्ण विश्वास होता, पण त्यांची रणनीती मला समजली नाही. इथिओपियाच्या सॅम्युअल फायरवोने आघाडी घेतली तेव्हा मी शर्यतीत आघाडीवर होतो. , मला वाटले की तो वेग वाढवत आहे, परंतु त्याउलट त्याने शर्यतीचा वेग कमी केला. मला हे समजले नाही. मग मला वाटले की शेवटच्या किलोमीटरमध्ये इतर धावपटू वेगाने धावतील. पण तसे झाले नाही आणि शेवटच्या लॅपपर्यंत शर्यत सुरूच राहिली".
संबंधित बातम्या