पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय खेळाडूंकडून आतापर्यंत अनेक ऐतिहासिक पराक्रम पाहायला मिळाले आहेत. आता पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेसमध्येही ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली.
बीडच्या अविनाश साबळे याने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अविनाश ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय ठरला. अविनाश पाचव्या क्रमांकावर राहून पात्र ठरला.
साबळेने दुसऱ्या Heat मध्ये ८ मिनिटे १५.४३ सेकंदांचा वेळ घेऊन रेस पूर्ण केली आणि पाचवा क्रमांक मिळविला. तर या Heat मध्ये मोरोक्कोच्या मोहम्मद टिंडौफतने ८ मिनिटे १०.६२ सेकंद अशी सर्वोत्तम कामगिरी करत अव्वल क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत एकूण तीन Heat होत्या आणि या तिन्ही हीटमध्ये अव्वल ५ मध्ये स्थान मिळवणारे खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. अशाप्रकारे, तीन Heat मधून एकूण १५ खेळाडू पात्र ठरले.
अविनाश साबळे याने शर्यतीची चांगली सुरुवात केली होती. पहिल्या १००० मीटरपर्यंत तो अव्वल राहिला. मात्र, २००० मीटर पूर्ण करेपर्यंत तो तिसऱ्या क्रमांकावर घसरला. साबळेने २००० मीटरचे अंतर ५ मिनिटे २८.७ सेकंदात पूर्ण केले. यानंतर, शर्यत पूर्ण होईपर्यंत तो पाचव्या स्थानावर घसरला. अशाप्रकारे त्याने पाचवे स्थान मिळवून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले.
८ मिनिटे १५.४३ सेकंद अविनाश साबळे याचे सर्वोत्तम नाही. गेल्या महिन्यात झालेल्या पॅरिस डायमंड लीगमधील शर्यत त्याने ८ मिनिटे आणि ०९.९१ सेकंदात पूर्ण केली होती, जी त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीसाठी पात्र होण्यासाठी त्याला त्याची सर्वोत्तम कामगिरी करता आली नाही.
पात्रता फेरीत अविनास साबळे पाचव्या स्थानावर राहिला याबाबत बोलताना तो म्हणाला की यावेळी जी एनर्जी वाचवली आहे ती अंतिम फेरीत वापरणार आहे.
अविनाश साबळे हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील असून तो सध्या भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे. यापूर्वीच्या स्पर्धांमध्ये झालेल्या चुका बाजूला ठेवून अविनाश साबळे यानं सुरुवातीपासून आघाडी घेतली होती.
महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात मांडवा या गावी १३ सप्टेंबर १९९४ रोजी अविनाशचा जन्म झाला. विशेष म्हणजे वयाच्या ६ वर्षांपासूनच अविनाशला धावण्याचा सराव आहे. त्याची शाळा घरापासून ७ किमी अंतरावर होती. तो रोज धावतच शाळेत पोहोचायचा. त्याची आई-वडील वीट भट्टी कामगार होते. घरातील गरिबीमुळे अविनाश कॉलेज करत करत पैशांसाठी इतर कष्टाची कामेही करायचा. १२ वी पूर्ण झाल्यानंतर अविनाश साबळे भारतीय लष्यकाराच्या ५ महार रेजिमेंटमध्ये सामील झाला.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये आतापर्यंत भारताच्या खात्यात तीन पदके आली आहेत. नेमबाजीत भारताला तिन्ही पदके मिळाली आहेत. आता भारताला चौथे पदक कोणत्या खेळात मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.