टेनिसचा महान खेळाडू नोव्हाक जोकोविच याने आपल्या करिअरमध्ये २४ ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. तो यावर्षीचे पहिले ग्रँण्डस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ च्या सेमी फायनलमध्ये पोहोचला आहे. पण जोकोविचचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास खूपच खडतर होता. त्याला आयुष्यात कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळाली नाही.
जोकोविचचा जन्म २२ मे १९८७ रोजी सर्बियामध्ये झाला. त्याने २००३ मध्ये आपल्या प्रोफेशनल टेनिस कारकिर्दीला सुरुवात केली. तर २०१० मध्ये त्याने पहिल्यांदा डेव्हिस कप विजेतेपद पटकावले. यानंतर Inaugural ATP Cup मध्ये त्याने त्याच्या देशाचे नेतृत्व केले आणि जेतेपद पटकावले. त्याआधी त्याने बिजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
२०२० मध्ये जोकोविचने एका मुलाखतीत त्याच्या खडतर प्रवासाची गोष्ट सांगितली होती. जोकोविच म्हणाला की, सर्बियामध्ये ९० च्या दशकात युद्धांचा काळ होता. युद्धांच्या दिवसांमध्येच मी मोठा झालो. त्यावेळी आपल्या देशात अनेक बंधने होती. ब्रेड, दूध, पाणी, या जीवनावश्यक मूलभूत गोष्टींसाठी रांगेत थांबावे लागायचे.
अशा गोष्टी तुम्हाला अधिक यश मिळवण्यासाठी मजबूत बनवतात. मला वाटते की तुम्हाला जे काही करायचे ते तुम्ही मनापासून केले पाहिजे. माझ्या कुटुंबासोबत खडतर जीवन जगून मी इथवर पोहोचलो आहे.
नोव्हाक जोकोविचचे बालपण बेलग्रेडमध्ये आजी-आजोबांसोबत गेले. त्यावेळी शहरात युद्धाची परिस्थिती होती. यामुळे जोकोविचला खुल्या कोर्टवर टेनिसचा सराव करता येत नसे आणि त्यासाठी त्याला रिकाम्या जलतरण तलावाची मदत घ्यावी लागायची.
तो एकदा म्हणाला होता की "मी अशा देशातून आलो आहे, ज्याने इराणप्रमाणेच अनेक संकटांना तोंड दिले आहे. आपल्या देशाचा इतिहास, परंपरा आणि संस्कृती खूप समृद्ध आहे. परंतु अलीकडच्या दशकात झालेल्या तीन वेगवेगळ्या युद्धांमुळे कठीण परिस्थिती झाली आहे. या युद्धांमुळे खूप त्रास होतो."
नोव्हाक जोकोविचने वयाच्या १४ व्या वर्षी एकेरी, दुहेरी आणि सांघिक स्पर्धांमध्ये युरोपियन चॅम्पियनशिप जिंकून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन २०११ च्या अंतिम फेरीत अँडी मरे याला पराभूत करून त्याने मागे वळून पाहिले नाही.
जोकोविचने ९४ एटीपी एकेरी खिताब जिंकले आहेत, ज्यात २४ ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपद, ६ एटीपी फायनल्स जेतेपदे आणि विक्रमी संयुक्त विक्रमी ३८ एटीपी मास्टर्स विजेतेपदांचा समावेश आहे.
३६ वर्षांचा नोव्हाक जोकोविच एकेकाळ दुध आणि ब्रेडसाठी रांगेत थांबायचा. पण आता तो जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर अनेकांना आश्चर्य वाटेल. जोकोविचची एकूण संपत्ती २४० मिलियन डॉलर्स आहे.
त्याने नुकतेच एक आलिशान घर खरेदी केले आहे. त्याच्याकडे आलीशान कार कलेक्शन आहे, ज्यात ॲस्टन मार्टिन, प्यूजिओट, मर्सिडीज-बेंझ, बेंटले आणि बीएमडब्ल्यूचा समावेश आहे. जोकोविचला घड्याळांचीही खूप आवड आहे. त्याच्याकडे घड्याळांचेही चांगले कलेक्शन आहे.
संबंधित बातम्या