Asian Para Games India Medals: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्यानंतर आशियाई पॅरा गेम्समध्येही भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकूण ६४ पदके जिंकली आहेत. ज्यात १५ सुवर्ण, २० रौप्य आणि २९ कांस्यपदकांचा समावेश आहे. आशियाई पॅरा गेम्स २०२३ च्या गुणतालिकेत भारत सहाव्या स्थानावर आहे.
आशियाई पॅरा गेम्सच्या गुणतालिकेत भारत सहाव्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत चीनने सर्वाधिक ३०० पदक जिंकली असून ते गुणतालिकेत अव्वल स्थानी आहेत. यानंतर इराण दुसऱ्या क्रमांकावर आहे. इराणने आतापर्यंत एकूण ७३ पदके जिंकली आहेत, ज्यात २४ सुवर्ण, ३० रौप्य आणि १९ कांस्यपदकांचा समावेश आहे. या यादीत जपान तिसऱ्या क्रमांकावर (२० सुवर्ण, २१ रौप्य आणि २८ कांस्य) आहे. चौथ्या क्रमांकावर असलेल्या थायलंडच्या खात्यात ६३ पदके (२० सुवर्ण, १३ रौप्य आणि २१ कांस्य) जमा झाली आहेत. उजबेकिस्तान ५५ पदकांसह पाचव्या क्रमांकावर आहे. उजबेकिस्तानने १७ सुवर्ण, १७ रौप्य आणि २१ कांस्यपदक जिंकले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आशियाई पॅरा गेम्स २०२३ मध्ये जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. पीएम मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे कौतूक केले आहे.
आशियाई पॅरा गेम्समध्ये चीनने आतापर्यंत सर्वाधिक पदके जिंकले आहेत. चीनने ९६ रौप्य आणि ८६ कांस्य पदकांसह ११८ सुवर्णपदके जिंकली. चीनच्या खात्यात आतापर्यंत एकूण ३०० पदके जमा झाली आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत भारतीय खेळाडूंनी प्रत्येक खेळात सुधारणा केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर आशियाई पॅरा गेम्समध्येही भारतीय खेळाडूंनी दम दाखवला आहे. भारताच्या सुमित अंतिलने बुधवारी चीनमधील हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. सुमित सध्याचा ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियन देखील आहे.