एशियन गेम्स 2023 मध्ये भारताने महिला क्रिकेटमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारत आणि मलेशिया यांच्यातील सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. आज झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने २ गडी गमावून १७३ धावा केल्या. प्रत्युत्तरात मलेशियाचा संघ केवळ दोन चेंडू खेळू शकला. यानंतर पावसाला सुरुवात झाली.
टीम इंडियासाठी शेफाली वर्माने फलंदाजीत इतिहास रचला. आशियाई क्रीडा स्पर्धेत अर्धशतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने १५ षटकात १७३ धावा केल्या. यादरम्यान स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा सलामीसाठी आल्या होत्या. स्मृती १६ चेंडूत २७ धावा करून बाद झाली. तर शेफालीने ३९ चेंडूंचा सामना करत ६७ धावा केल्या. तिने ४ चौकार आणि ५ षटकार मारले. आशियाई क्रीडा स्पर्धेत अर्धशतक झळकावणारी शेफाली भारताची पहिली महिला खेळाडू ठरली.
भारताकडून जेमिमाह रॉड्रिग्जने ४७ धावांची नाबाद खेळी खेळली. तिने २९ चेंडूत ६ चौकार मारले. रिचा घोषने ७ चेंडूंचा सामना करत नाबाद २१ धावा केल्या. रिचाने ३ चौकार आणि १ षटकार लगावला.
भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना मलेशियाचा संघ केवळ २ चेंडू खेळू शकला. यानंतर पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीचा सामना २४ सप्टेंबर रोजी होणार आहे. अंतिम सामना २५ सप्टेंबर रोजी होणार आहे.
शेफालीचा एकूण रेकॉर्ड चांगला राहिला आहे. तिने २२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५३५ धावा केल्या आहेत. या काळात तिने ४ अर्धशतके झळकावली आहेत. शेफालीने ५९ टी-20 सामन्यांमध्ये १३६३ धावा केल्या आहेत. शेफालीने या फॉरमॅटमध्ये ५ अर्धशतके झळकावली आहेत. तिने २ कसोटी सामनेही खेळले आहेत. यामध्ये २४२ धावा केल्या आहेत. या काळात तिने ३ अर्धशतके झळकावली आहेत.