एशियन गेम्स 2023 मध्ये क्रिकेट स्पर्धेचे सेमी फायनलचे चार संघ निश्चित झाले आहेत. चौथ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बांगलादेशने रोमहर्षक विजय नोंदवला. बांगलादेश संघाने मलेशियाचा २ धावांनी पराभव केला. या विजयासह बांगलादेश संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. आता सेमीफायनलमध्ये बांगलादेशचा सामना भारताशी होणार आहे.
चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या बांगलादेश विरुद्ध मलेशिया सामन्यात बांगलादेशचा कर्णधार सैफ हसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हसनचा हा निर्णय अत्यंत वाईट ठरला आणि बांगलादेश संघाने ३ धावांत ३ विकेट गमावल्या. येथून कर्णधार सैफ हसन (५०), अफिफ हुसैन (२३), शहादत हुसेन (२१) आणि झाकीर अली (१४) यांनी आपल्या संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. बांगलादेश संघाने २० षटकांत ५ गडी गमावून ११६ धावा केल्या.
११७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मलेशियाची सुरुवातही खराब झाली. ३८ धावांपर्यंत संघाने ४ विकेट गमावल्या होत्या. येथून विरनदीप सिंगची ५२ धावांची स्फोटक खेळी आणि विजय उन्नी (१४) आणि ऐनुल हफीज (१४) यांच्या समंजस खेळीने मलेशियाला विजयाच्या मार्गावर आणले. मात्र, शेवटच्या तीन चेंडूंवर ५ धावांची गरज असताना वीरनदीप बाद झाला आणि त्यानंतर सामना मलेशियाच्या हातातून निसटला. मलेशियाचा संघ निर्धारित २० षटकांत केवळ ११४ धावा करू शकला.
आशियाई क्रीडा २०२३ च्या उपांत्य फेरीत बांगलादेशचा संघ आता भारताला भिडणार आहे. हा सामना ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० वाजता सुरू होईल. भारताने उपांत्यपूर्व फेरीत नेपाळला पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आमनेसामने आहेत. म्हणजेच भारत आणि पाकिस्तानने आपापले सामने जिंकले तर एशियन गेम्स क्रिकेटची फायनल भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगेल.
संबंधित बातम्या