Asian Games 2023: चीनमधील हाँगझोऊ शहरात सुरु असलेल्या आशियाई क्रिडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी रविवारी विविध खेळात दमदार प्रदर्शन करत एका दिवशी तब्बल १५ पदक जिंकण्याचा विक्रम रचला. यानंतर सोमवारी भारताने महिला टेबल टेनिस दुहेरीत भारतानं ऐतिहासिक पदक जिंकलं. भारताच्या टेबल टेनिसपटू सुतीर्था मुखर्जी आणि अहिका मुखर्जी यांनी महिला टेबल टेनिस दुहेरीत भारताला कांस्यपदक जिंकून दिलं. भारतानं पहिल्यांदाच महिला टेबल टेनिस दुहेरीत पदक जिंकलं आहे. मात्र, उपांत्य फेरीत भारतीय जोडीला पराभवाचा सामना करावा लागला.
सेमीफायनलमध्ये सुतीर्था- अहिका जोडीला नार्थ कोरियाच्या सुयोंग चा आणि सुगयोंग पाक यांच्याविरुद्ध ३-४ पराभव स्वीकारावा लागला. भारतीय जोडीकडून सुवर्णपदाकाची अपेक्षा केली जात होती. मात्र, त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महत्त्वाचे म्हणजे, भारताने पहिल्यांदाच आशिया क्रिडा स्पर्धेच्या महिला टेबल टेनिस दुहेरीत पदक जिंकले आहे. ज्यामुळे भारताचा गेल्या अनेक वर्षांचा दुष्काळ संपला आहे.
भारताने यापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये पदके जिंकली आहेत. मात्र, महिला दुहेरीत भारतीय जोडीने पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी २०१८ मध्ये पुरूष संघाने आशियाई क्रिडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. याचवेळी शरथ आणि मनिका बत्रा यांनी मिश्र दुहेरीत कांस्यपदक जिंकले. टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्यासाठी भारताला आणखी वाट पाहावी लागणार आहे.
आशियाई क्रीडा २०२३ मध्ये भारताने आतापर्यंत एकूण ५६ पदके जिंकली आहेत. यामध्ये १३ सुवर्ण, २१ रौप्य आणि २२ कांस्यपदकांचा समावेश आहे. भारताला सोमवारी रोलर स्केटिंगमध्ये दोन कांस्यपदके मिळाली. यानंतर सुतीर्थ आणि अहिका यांनी टेबल टेनिसमध्ये कांस्यपदक जिंकले.
संबंधित बातम्या