मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ravindra Jadeja: भारताला मोठा धक्का, रवींद्र जडेजा आशिया कपमधून बाहेर! ‘या’ खेळाडूचा संघात समावेश

Ravindra Jadeja: भारताला मोठा धक्का, रवींद्र जडेजा आशिया कपमधून बाहेर! ‘या’ खेळाडूचा संघात समावेश

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 02, 2022 05:48 PM IST

Ravindra Jadeja Out Of Asia Cup: भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा आशिया चषक स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अक्षर पटेलचा संघात समावेश केला आहे.

Ravindra Jadeja
Ravindra Jadeja

भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा आशिया चषक स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (CCI) अक्षर पटेलचा संघात समावेश केला आहे. जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. सध्या त्याची बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून काळजी घेतली जात आहे.

अक्षर पटेल हा आधीच राखीव खेळाडू म्हणून संघात होता आणि लवकरच तो आता दुबईतील संघात सामील होणार आहे. पाकिस्तान आणि हाँगकाँगचा पराभव करून भारतीय संघ आशिया चषकाच्या सुपर-४ मध्ये पोहोचला आहे. यामध्ये भारताला श्रीलंका आणि अफगाणिस्तानचा सामना करावा लागणार आहे. जर पाकिस्तानने हाँगकाँगला हरवले तर सुपर-४ मध्ये भारत-पाकिस्तान सामनाही होणार आहे.

शानदार फॉर्मात होता जडेजा

आशिया कपमध्ये रवींद्र जडेजा जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने पाकिस्तानविरुद्ध शानदार गोलंदाजी केली होती. तसेच, फलंदाजीत २९ चेंडूत ३५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती. त्याने हार्दिक पांड्यासोबत अर्धशतकी भागीदारी करत भारतीय संघाला संकटातून बाहेर काढले आणि विजयाच्या उंबरठ्यावर नेले होते. या सामन्यात त्याने एक महत्त्वाचा झेलही घेतला होता. त्याचवेळी हाँगकाँगविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात जडेजाने चार षटकात केवळ १५ धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. याशिवाय त्याने एक शानदार धावबादही केला होता.

जडेजा बाहेर गेल्यानंतर आशिया कपसाठी भारताचा संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.

 

WhatsApp channel