Asia Cup 2023 : पाकिस्तानला मोठा झटका, आता आशिया चषक 'या' देशात होणार-asia cup 2023 expected to move out of pakistan sri lanka likely to host tournament ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Asia Cup 2023 : पाकिस्तानला मोठा झटका, आता आशिया चषक 'या' देशात होणार

Asia Cup 2023 : पाकिस्तानला मोठा झटका, आता आशिया चषक 'या' देशात होणार

May 09, 2023 04:03 PM IST

asia cup 2023 sri lanka : आशिया कप 2023 पाकिस्तानात होणार नाही, आता श्रीलंकेत होणार आहे. अशा स्थितीत पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का आहे.

asia cup 2023
asia cup 2023

ind vs pak odi asia cup venue : आशिया चषक 2023 पाकिस्तानात होणार नाही, आता ही स्पर्धा श्रीलंकेत आयोजित केली जाणार आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का आहे. यापूर्वी ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होती. विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत जाण्यास भारताने यापूर्वीच नकार दिला होता. तेव्हापासून पाकिस्तानमधील आशिया कपच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले होते.

यापूर्वी पाकिस्तानने आशिया चषकासाठी हायब्रीड मॉडेलही सुचवले होते. पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी म्हणाले होते की, पाकिस्तानने या स्पर्धेचे सामने मायदेशात खेळावेत, तर भारत आपले आशिया कपचे सामने यूएईसारख्या तटस्थ ठिकाणी खेळू शकतो.

हायब्रीड मॉडेल नाकारले!

पण आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. एकूणच 'हायब्रीड मॉडेल'वर स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव सदस्य देशांनी फेटाळला आहे. दोन्ही देशांमधील राजनैतिक तणावामुळे बीसीसीआयने भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला होता. यानंतर पीसीबीला हायब्रीड मॉडेल पर्याय सुचवणे भाग पडले. ज्यामध्ये भारत आपले सामने यूएईमध्ये खेळेल तर पाकिस्तान आपले सामने मायदेशात खेळेल, असा हा पर्याय होता.

श्रीलंकेचे नाव का पुढे आले?

संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये सप्टेंबर महिन्यात अत्यंत दमट हवामान असते. अशा परिस्थितीत खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे ही स्पर्धा युएईऐवजी श्रीलंकेत होण्याची शक्यता अधिक आहे.

सोबतच एका सूत्राने सांगितले की, “प्रसारणकर्ते देखील दोन देशांमध्ये स्वतंत्र टीम पाठवू इच्छित नाहीत. तसेच, UAE च्या विपरीत, श्रीलंकेतील दोन शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी विमानाचीही आवश्यकता नाही. तुम्ही कोलंबो, गाले किंवा कॅंडीमध्ये खेळाल तर ही शहरे एकमेकांच्या जवळ आहेत.