मराठी बातम्या  /  क्रीडा  /  PAK vs SL Asia Cup Final: आशिया चषकात श्रीलंका पाकिस्तानवर भारी, पाहा आतापर्यंतची आकडेवारी

PAK vs SL Asia Cup Final: आशिया चषकात श्रीलंका पाकिस्तानवर भारी, पाहा आतापर्यंतची आकडेवारी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 11, 2022 01:17 PM IST

आशिया चषकात दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत १६ सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान श्रीलंकेच्या संघाने ११ वेळा विजय मिळवला. त्याचवेळी पाकिस्तानने केवळ ५ सामने जिंकले.

PAK vs SL
PAK vs SL

आशिया चषकाचा अंतिम सामना रविवारी (११ सप्टेंबर) पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. हे दोन्ही संघ चौथ्यांदा आशिया चषकाच्या फायनलमध्ये भिडणार आहेत. श्रीलंकेने याआधी फायनलमध्ये पाकिस्तानला दोनदा पराभव केला होता. १९८६ आणि २०१४ मध्ये श्रीलंका आशिया चषकाचा चॅम्पियन होता. तेव्हा पाकिस्तानी संघ उपविजेता ठरला होता. तर २००० मध्ये श्रीलंकेला हरवून पाकिस्तान चॅम्पियन बनला होता.

असा आहे दोन्ही संघांमधील रेकॉर्ड

श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत २२ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान श्रीलंकेने ९ सामने जिंकले असून पाकिस्तानने १३ सामने जिंकले आहेत.

आशिया चषकात श्रीलंका वरचढ

आशिया चषकाबद्दल बोलायचे झाले तर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत १६ सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान श्रीलंकेच्या संघाने ११ वेळा विजय मिळवला. त्याचवेळी पाकिस्तानने केवळ ५ सामने जिंकले.

श्रीलंकन फलंदाज-गोलंदाज फॉर्ममध्ये

श्रीलंकेकडे कुसल मेंडिस आणि पाथुम निसांका हे दोन उत्कृष्ट सलामीवीर आहेत. दुसरीकडे, दनुष्का गुणतिलक, भानुका राजपक्षे शनाका आणि करुणारत्ने यांनीही उपयुक्त योगदान दिले आहे. आशिया चषक स्पर्धेतील आतापर्यंतच्या पाच सामन्यांमध्ये श्रीलंकेच्या फलंदाजांनी २८ षटकार आणि ६२ चौकार मारले आहेत, यावरून त्यांची आक्रमक वृत्ती दिसून येते. गोलंदाजीत महिष तीक्षणा आणि वानिंदू हसरंगासह दिलशान मदुशंका याने कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

पाकिस्तानला बाबरच्या फॉर्मची चिंता

याउलट, पाकिस्तानला त्यांचा कर्णधार बाबर आझमच्या फॉर्मची चिंता आहे. बबरने आतापर्यंत ५ सामन्यांत केवळ ६३ धावा केल्या आहेत. तो अंतिम सामन्यात नक्कीच मोठी खेळी खेळण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाजी ही सध्या पाकिस्तानची मजबूत बाजू असल्याचे दिसते. नसीम शाहच्या खेळात सातत्याने सुधारणा होत आहे तर हरिस रौफ आणि मोहम्मद हसनैनही चांगली कामगिरी करत आहेत.

टॉस जिंकणे महत्त्वाचे ठरत आहे

दुबईत टॉस जिंकणे महत्त्वाचे ठरत आहे. बहुतेकवेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची कामगिरी चांगली झाली नाही. भारत आणि श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली होती. हे दोन्ही सामने पाकने गमावले होते.

दोन्ही देशांचे संभाव्य संघ

श्रीलंका: पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीप), चरित अस्लंका/धनंजया डी सिल्वा, दनुष्का गुनाथिलका, भानुका राजपक्षे, दासुन शानाका (कर्णधार), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षना, प्रमोद मदुशन/असिथा मदुशान.

पाकिस्तान: मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, आसिफ अली, खुशदिल शाह, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद हसनैन.

WhatsApp channel

संबंधित बातम्या