या महिन्याच्या अखेरीस आशिया चषक सुरु होणार आहे. तर २८ ऑगस्ट रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. या सामन्याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या सामन्याची सर्व तिकिटे तीन तासात विकली गेली होती. आता एका बातमीनुसार या सामन्याची नकली तिकिटेही बाजारात आली आहेत. त्यामुळे आयोजकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
आता आयोजक नकली तिकिटांची ओळख स्मार्ट तंत्रज्ञानाद्वारे करणार आहेत. दुबईत होणाऱ्या या सामन्यापूर्वी स्थानिक पोलीस आणि स्टेडियमच्या अधिकाऱ्यांना आधीच सतर्क करण्यात आले आहे. दुबई पोलिसांच्या ऑपरेशन अफेअर्सनुसार, दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.
ब्रिगेडियरने दुसऱ्यांदा घेतला सुरक्षेचा आढावा
या सामन्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्टेडियमची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दुबई पोलिसांचे कार्यवाहक सहाय्यक कमांडर ब्रिगेडियर रशीद खलिफा यांनी दुसऱ्यांदा सुरक्षे यंत्रणेची पाहणी केली आहे. तपासानंतर त्यांनी सामना आयोजित करण्यास हिरवा झेडा दाखवला आहे. अशा स्थितीत सामन्याचे स्थळ आणि सामना आयोजित करण्यास कोणतीही अडचण नाही. तसेच, सुरक्षा व्यवस्थेत सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या सोबतच, ब्रिगेडियर म्हणाले की, "सुरक्षा व्यवस्थेसोबतच आम्ही स्थानिक लोकांनाही जागरूक करण्याचे काम करत आहोत. प्रत्येक व्यवस्थेसह, सामान्य लोकांना सुरक्षा प्रोटोकॉलबद्दल शिक्षित केले जात आहे. सुरक्षेत कोणतीही हलगर्जीपणा केला जाणार नाही".
पाकिस्तानने याच मैदानावर केला होता भारताचा पराभव
२०२१ च्या T20 विश्वचषकात दुबईच्या याच मैदानावर पाकिस्तानने टीम इंडियाचा १० गडी राखून पराभव केला होता. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानकडून पराभव होण्याची ती पहिलीच वेळ होती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ पाकिस्तानपाठोपाठ न्यूझीलंडकडून देखील पराभूत झाला आणि ग्रुप स्टेजमध्येच स्पर्धेतून बाद झाला होता. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मागील पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने मैदानातर उतरेल.