
Argentina Players Evacuated On Helicopters Video: अर्जेंटिनाने ३६ वर्षांनंतर वर्ल्डकप जिंकला. वर्ल्डकप ट्रॉफी घेऊन अर्जेंटिनाचा संघ मायदेशी परतला आहे. २० डिसेंबरच्या पहाटे संपूर्ण संघ अर्जेंटिनातील इझिझ विमानतळावर पोहोचला. यावेळी लाखो चाहते वर्ल्ड चॅम्पियन संघाचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर उपस्थित होते.
वर्ल्ड चॅम्पियन संघाची एक झलक पाहण्यासाठी लाखो चाहत्यांनी गर्दी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी वर्ल्ड चॅम्पियन संघाची खुल्या बसमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीदरम्यान तब्बल ५० लाख लोक संघाच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरले होते. वर्ल्ड चॅम्पियन संघाची खुल्या बसमधून परेड सुरू झाली. जवळपास ११ किमीपर्यंत रस्त्यावर खचाखच गर्दी होती.
चाहत्यांनी बसमध्ये उड्या मारल्या
अशा परिस्थितीत लोकांनी खेळाडूंच्या बसवर चढायचा प्रयत्न केला. या दरम्यान, खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या खुल्या बसमध्ये पुलावरून दोन जणांनी उडी मारल्याने परेड काही वेळातच थांबवण्यात आली. त्यातील एकजण बसच्या आत तर दुसरा फूटपाथवर पडला. यानंतर प्रकरण गंभीर होत असल्याचे पाहून एक हेलिकॉप्टर पाचारण करण्यात आले आणि टीमला एअरलिफ्ट करण्यात आले.
खेळाडूंना पाहायला न मिळाल्याने चांहत्यांचा संताप
आपल्या आवडत्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी लाखो लोक ब्युनोस आयर्सच्या रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आणि परेड थांबली. लोक झेंडे घेऊन आले होते, ते उत्साहाने नाचत होते आणि गात होते पण त्यांची संख्या इतकी जास्त होती की, त्यामुळे खेळाडूंची परेड थांबवून त्यांना हेलिकॉप्टरमधून परेड करावी लागली.
त्यानंतर हेलिकॉप्टरने राजधानीबाहेर अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनच्या मुख्यालयाकडे उड्डाण केले. मात्र, त्यानंतरही काही चाहत्यांनी रस्त्यावर आनंदोत्सव साजरा केला, परंतु १९८६ नंतर प्रथमच त्यांच्या संघाने विश्वचषक जिंकला होता आणि वर्ल्ड चॅम्पियन संघाची एक झलकही पाहायला मिळाली नाही, या कारणाने अनेक चाहत्यांची निराशा झाली. यावेळी काही चाहत्यांनी संतापदेखील व्यक्त केला.
संबंधित बातम्या
