पाकिस्तानच्या अर्शद नदीम याने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. अर्शदने भालाफेक स्पर्धेत सुवर्ण जिंकले. यानंतर अर्शद नदीम हा पाकिस्तानसाठी वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला खेळाडू बनला.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकताच पाकिस्तान वेगळ्याच दुनियेत पोहोचला आहे. ऑलिम्पिक सुवर्ण जिंकताच एका पाकिस्तानी नेत्याने फिफा विश्वचषकाबाबत मोठा दावा केला आहे.
पाकिस्तानचे नॅशनल असेंब्ली सदस्य आणि युवा नेते बिलावल भुट्टो म्हणाले की, आपल्याला थोडी मदत मिळाली तर पाकिस्तान फिफा वर्ल्ड कपही जिंकू शकतो.
विशेष म्हणजे, २१० देशांच्या यादीत पाकिस्तानचे फिफा रँकिंग १९७ आहे.
शुक्रवारी (९ ऑगस्ट) बोलताना बिलावल भुट्टो म्हणाले, “फक्त ऑलिम्पिक किंवा क्रिकेटमध्येच नाही, जर त्यांना थोडा पाठिंबा लाभला तर आपण फिफा विश्वचषकही जिंकू शकतो. मला अर्शद नदीमच्या विजयाबद्दल अभिनंदन करायचे आहे. आम्ही सर्वजण त्याच्या विजयाचे कौतुक करतो. त्याने अशक्य वाटत असलेली गोष्ट शक्य करून ऑलिंपिक सुवर्णपदक मिळवले. यातून हे दिसते की पाकिस्तानचे युवा काय मिळवू शकतात”.
बिलावल भुट्टो पुढे म्हणाले, "कराचीमधील प्रत्येक मूल फिफा विश्वचषक जिंकू शकतो. मी दोन-तीन आठवड्यांपूर्वी पेशावरला गेलो होतो. तिथल्या काही मुलींनी तायक्वांदोमध्ये पदके जिंकली. येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये सर्व खेळातून पाकिस्तानला पदकं आली पाहिजे, हे आपले ध्येय असले पाहिजे. मी पाकिस्तानच्या क्रीडा मंत्र्यांना विनंती करेन की त्यांनी सर्व क्षेत्रांतून अर्शद नदीम यावेत यासाठी उपक्रम राबवले पाहिजेत".
भालाफेकच्या अंतिम फेरीत नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम यांचा पहिला राऊंड फाउल गेला. पण एकीकडे नीरज चोप्राने दुसऱ्या थ्रोमध्ये ८९.४५ मीटर अंतर कापले, तर अर्शदने ९२.९७ मीटर अंतर भाला फेकून ऑलिम्पिक विक्रम केला. आपल्या शेवटच्या थ्रोमध्येही अर्शदने ९१ मीटर अंतरावर भाला फेकून सर्वांना चकित केले. दुसरीकडे, नीरज चोप्राचे एकूण ५ प्रयत्न फाऊल झाले, त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.