मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Asia Cup Final: पाकिस्तानचा पराभव, अफगाणिस्तानात सेलिब्रेशन; काबूलच्या रस्त्यांवर लोकांचा जल्लोष

Asia Cup Final: पाकिस्तानचा पराभव, अफगाणिस्तानात सेलिब्रेशन; काबूलच्या रस्त्यांवर लोकांचा जल्लोष

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 12, 2022 04:29 PM IST

Afghanistan Celebration after Pakistan losing Asia Cup final: आशिया चषकाच्या फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव करुन ट्रॉफी जिंकली. सध्या कठीण काळातून जात असलेल्या श्रीलंकेच्या लोकांसाठी हा विजय खूप खास आहे. श्रीलंकेच्या कामगिरीवर सर्वजण खूश असून तेथील नागरिक या युवा संघाचे अभिनंदन करत आहेत. त्याचवेळी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्येही लोकांनी पाकिस्तानचा पराभव आणि श्रीलंकेच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

asia cup 2022
asia cup 2022

आशिया चषक टी-२० स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (११ सप्टेबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना जिंकत श्रीलंकेने सहाव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले. फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा २३ धावांनी धुव्वा उडवला.

श्रीलंकेने प्रथम फलंदाजी, नंतर उत्कृष्ट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर पाकिस्तानला धुळ चारली. या पराभवामुळे पाकिस्तानचे चाहते प्रचंड प्रमाणात निराश आणि दु:खी झाले. तर, अफगाणिस्तानमध्ये मात्र, श्रीलंकेच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. रविवारी रात्री काबूलच्या रस्त्यांवर लोकांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडून आणि डान्स करुन जल्लोष केला.

सध्या कठीण काळातून जात असलेल्या श्रीलंकेच्या लोकांसाठी हा विजय खूप खास आहे. श्रीलंकेच्या कामगिरीवर सर्वजण खूश असून लोक या युवा संघाचे अभिनंदन करत आहेत. त्याचवेळी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्येही लोकांनी पाकिस्तानचा पराभव आणि श्रीलंकेच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. अफगाण नागरिकांनी रस्त्यावर उतरुन फटाके फोडले तसेच डान्सही केला. याचे व्हिडीओही समोर आले आहेत.

अफगाणिस्तानसाठीही आशिया चषक शानदार राहिला

अफगाणिस्तान संघासाठीही यंदाचा आशिया चषक शानदार राहिला आहे. अफगाणिस्तानने ग्रुप सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून स्पर्धेत विजयी सुरुवात केली होती. त्यानंतर अफगाण संघाने बांगलादेशला हरवून सुपर ४ फेरी गाठली. मात्र, सुपर फोरमध्ये अफगाणिस्तानने सर्वच सामने हरले.

अफगाण-पाकिस्तानी खेळाडू-प्रेक्षकांमध्ये हाणामारी

सुपर फोरमधील अफगाणिस्तानचा पाकिस्तानविरुद्धचा सामना खूपच रोमांचक झाला होता. या थरारक सामन्यात दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये धक्काबुक्की झाली होती. तर सामन्यानंतर दोन्ही देशांच्या प्रेक्षकांमध्ये देखील हाणामारी झाल्याचे व्हिडीओ समोर अले होते. त्यानंतर दोन्ही देशांचे माजी क्रिकेटपटू सोशल मीडियावरही एकमेकांना भिडले होते.

आशिया चषकात श्रीलंकन खेळाडूंची शानदार कामगिरी

ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी श्रीलंकेची कामगिरी फारशी खास नव्हती. विशेष म्हणजे, श्रीलंकेचा संघ विजेतेपदाचा दावेदारही मानला जात नव्हता. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त अफगाणिस्तानला या स्पर्धेच्या जेतेपदाचे दावेदार मानले जात होते. तसेच, पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा पराभवदेखील केला होता.

मात्र, या जिव्हारी लागणाऱ्या या पराभवानंतर श्रीलंकेने जोरदार कमबॅक केले आणि स्पर्धेतील सर्वच संघांचा पराभव करुन आशिया चषकावर आपले नाव कोरले.

अंतिम सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना १७० धावा केल्या होत्या. भानुका राजपक्षेने सर्वाधिक ७१ आणि वनिंदू हसरंगाने ३६ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ केवळ १४७ धावाच करू शकला. मोहम्मद रिझवानने ५५ आणि इप्तीखार अहमदने ३२ धावा केल्या. श्रीलंकेकडून प्रमोद मदुशनने ४ आणि वनिंदू हसरंगाने ३ बळी घेतले.

 

WhatsApp channel