मराठी बातम्या  /  क्रीडा  /  AFG vs PAK 1st T20 : अफगाणिस्तानने उडवला पाकिस्तानचा धुव्वा, आशिया चषकातील पराभवाचा बदलाही घेतला

AFG vs PAK 1st T20 : अफगाणिस्तानने उडवला पाकिस्तानचा धुव्वा, आशिया चषकातील पराभवाचा बदलाही घेतला

Mar 25, 2023 12:23 PM IST

AFG vs PAK 1st T20 highlights : अफगाणिस्तानने टी-20 सामन्यात पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव करून इतिहास रचला आहे. शारजाह येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने २० षटकात ९२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने ९८ धावा करून सामना जिंकला.

AFG vs PAK 1st T20 highlights
AFG vs PAK 1st T20 highlights

अफगाणिस्तानने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव करून खळबळ उडवून दिली आहे. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर शुक्रवारी (२४ मार्च) झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने १३ चेंडू बाकी असताना ९३ धावांचे लक्ष्य गाठले. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात अफगाणिस्तानच्या संघाने पहिल्यांदाच पाकिस्तानचा पराभव केला आहे. दोन्ही संघांमधील या मालिकेतील पुढील सामना २६ मार्च रोजी याच मैदानावर होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवातही खूपच खराब झाली आणि पॉवरप्लेमध्येच त्यांनी २७ धावांत ३ विकेट गमावल्या. यादरम्यान रहमानउल्ला गुरबाज (१६), इब्राहिम झादरान (०) आणि गुलबदिन नायब यांना फारसे योगदान देता आले नाही. करीम जनतही ७ धावा करून बाद झाला, त्यामुळे धावसंख्या ४ विकेटवर ४५ धावा झाली. येथून मोहम्मद नबी आणि नजीबुल्ला झादरान यांनी ५३ धावांची नाबाद भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.

सामनावीर ठरलेल्या मोहम्मद नबीने ३३ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ३८ धावा केल्या. त्याचवेळी नजीबुल्लाहने दोन चौकारांच्या मदतीने नाबाद १७ धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून इहसानुल्लाहने सर्वाधिक दोन बळी घेतले.

पाकिस्तानचा डाव

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या पाकिस्तानी संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्यांनी मोहम्मद हॅरिसची (६) विकेट गमावली. पुढच्याच षटकात अब्दुल्ला शफीक शुन्यावर बाद झाला. त्यामुळे पाकिस्तानची धावसंख्या दोन बाद २२ अशी झाली. यानंतर, दुसरा सलामीवीर सॅम अयुब (१७) देखील पॉवरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला. त्यामुळे संघाची धावसंख्या तीन बाद ३९ अशी झाली. यानंतर पाकिस्तानने तीन धावांच्या आत तयेब ताहिर (१६) आणि आझम खान (०) यांचे विकेटही गमावले.

पाच गडी बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा डाव पुन्हा रुळावर येऊ शकला नाही. त्यांनी २० षटकांत नऊ गडी गमावून ९२ धावा केल्या. इमाद वसीमने ३२ चेंडूत १८ धावा केल्या, तर कर्णधार शादाब खान (१२), सॅम अयुब (१७) आणि तैयब ताहिर (१६) यांनी दुहेरी आकडा गाठला.

अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकी, मुजीब उर रहमान आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी दोन खेळाडूंना बाद केले. तर कर्णधार राशिद खान, अजमतुल्ला आणि नवीन उल हक यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

अफगाणिस्तानने घेतला आशिया कपमधील पराभवाचा बदला

या विजयासह अफगाणिस्तानने गतवर्षीच्या आशिया कपमधील पराभवाचा बदला घेतला आहे. शारजाहमध्येच झालेल्या त्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने ६ विकेट गमावत १२९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने एकवेळ ११८ धावांवर ९ विकेट गमावल्या होत्या, मात्र नसीम शाहने शेवटच्या षटकात सलग २ षटकार मारत सामना जिंकला. त्या सामन्यादरम्यान दोन्ही संघांमध्ये तणावाचे वातावरणही पाहायला मिळाले. पाकिस्तानी खेळाडू आसिफ अलीने तर अफगाण गोलंदाजाला मारण्यासाठी बॅट उगारली होती. दोन्ही देशांच्या प्रेक्षकांमध्येही जोरदार राडा झाला होता.

WhatsApp channel

संबंधित बातम्या