AFC Asian Cup 2024 India Vs Australia : एएफसी आशियाई चषक (AFC Asian Cup 2024) स्पर्धेत भारताचा पहिल्याच सामन्यात पराभव झाला आहे. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने शनिवारी (१२ जानेवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळला. कतारच्या अल रेयान येथील अहमद बिन अली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा २-० असा धुव्वा उडवला.
भारतीय संघाने सुरुवातीला शानदार खेळ केला. पहिल्या हाफच्या अखेरपर्यंत सामन्यात एकही गोल झाला नाही. पहिल्या हाफनंतर ऑस्ट्रेलियाने ५०व्या आणि ७३व्या मिनिटाला गोल करत सामना जिंकला.
भारतीय गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूच्या चुकीचा फायदा घेत जॅक्सन इर्विनने ५० व्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल करत ऑस्ट्रेलियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर ७३व्या मिनिटाला जॉर्डन बोसने रिले मॅकग्रीच्या उत्कृष्ट पासचे रूपांतर गोलमध्ये केले.
ऑस्ट्रेलियन संघाने संपूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवले, मात्र पहिल्या हाफमध्ये त्यांना एकही गोल करता आला नाही. या सामन्यात भारतीय संघाने बचावात चमकदार कामगिरी केली, पण शेवटी भारतीय खेळाडू दडपणाखाली आले. याचा फायदा ऑस्ट्रेलियाने घेतला.
ब गटातील भारतीय संघाचा हा सर्वात कठीण सामना होता. यानंतर भारताला उझबेकिस्तान आणि सीरिया यांच्याशी खेळायचे आहे, जे ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत कमकुवत संघ आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया फुटबॉलमध्ये ९ वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियाने ६ वेळा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर भारताने दोन वेळा विजय मिळवला आहे. एक सामना अनिर्णित राहिला.
एएफसी आशियाई चषक स्पर्धेत भारत पाचव्यांदा खेळत आहे. यापूर्वी टीम इंडिया १९६४, १९८४, २०११ आणि २०१९ मध्ये या स्पर्धेचा भाग बनली होती. फिफा क्रमवारीत भारतीय संघ सध्या जागतिक क्रमवारीत १०२ व्या क्रमांकावर आहे.
AFC आशियाई चषक २०२४ मध्ये भारत हा त्यांच्या गटात सर्वात खालच्या क्रमांकाचा संघ आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाशिवाय उझबेकिस्तान आणि सीरिया हे ब गटातील इतर दोन संघ आहेत.
संबंधित बातम्या