पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मधून एक अतिशय प्रेरणादायी बातमी समोर आली आहे. वास्तविक, ७ महिन्यांच्या 'गर्भवती' पॅरा ॲथलीटने तिरंदाजीत पदक जिंकून इतिहास रचला आहे. हा पराक्रम ग्रेट ब्रिटनच्या जोडी ग्रिनहॅम हिने केला आहे.
यानंतर आता प्रत्येकजण जोडी ग्रिनहॅमच्या या कर्तृत्वाला सलाम करत आहे. आई ही खरी योद्धा असल्याचे चाहते सांगत आहेत. जोडी ग्रिनहॅमने तिरंदाजीमध्ये पदक जिंकले. आता तिचे जगभरातून तिच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
जोडी ग्रिनहॅमने तिरंदाजीत कांस्यपदक जिंकले. ३१ ऑगस्ट रोजी जोडी ग्रिनहॅमने महिलांच्या कंपाऊंडमध्ये ग्रेट ब्रिटनच्याच फोबी पॅटरसन पेनविरुद्ध कांस्यपदकाचा सामना खेळला. या सामन्यात ग्रिनहॅमने १४२-१४१ गुणांसह विजय मिळवला. पराभूत झालेल्या फोबी पॅटरसन पाइनने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
जोडी ग्रिनहॅम गर्भवती असताना पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली पॅरा ॲथलीट ठरली आहे. ती सुमारे २८ आठवड्यांची म्हणजेच ७ महिन्यांची गर्भवती होती. असे असतानाही तिने पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि आता पदक जिंकून आपले नाव इतिहासात कोरले. विशेष म्हणजे, जोडी ग्रिनहॅम हिच्या डाव्या हाताला अपंगत्व आहे.
दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, कांस्यपदक जिंकल्यानंतर जोडी ग्रिनहॅमने सांगितले की, टार्गेटवर निशाणा लावताना बाळाने पोटात लाथ मारणे थांबवले नाही. जणू काही मूल विचारत आहे, आई, तू काय करतेस? पण माझ्या पोटातील हा आधार एक सुंदर आठवण आहे. मला माझा अभिमान आहे. मी अडचणींचा सामना केला आहे आणि हे अजिबात सोपे नव्हते."