देशात सध्या प्रो कबड्डी लीग २०२४ चा थरार सुरू आहे. PKL च्या या ११ व्या हंगामात आतापर्यंत अनेक संघ आहेत, ज्यांनी प्लेऑफसाठी आपला दावा मजबूत केला आहे. या संघांची आतापर्यंतची कामगिरी पाहता त्यांचे प्लेऑफमध्ये जाणे निश्चित असल्याचे दिसून येत आहे. जर हे संघ असेच खेळत राहिले तर ते सहज प्लेऑफसाठी पात्र ठरतील.
मात्र, यंदाच्या हंगामात असेही काही संघ आहेत, ज्यांची आतापर्यंतची कामगिरी तितकीशी चांगली नाही. येथे आपण अशाच तीन संघांबद्दल जाणून आहोत, ज्यांनी प्रो कबड्डी लीगचे विजेतेपद पटकावले आहे परंतु या हंगामात ते प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकणार नाहीत.
या मोसमात दबंग दिल्लीचा संघ ज्या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ओळखला जातो, तशी कामगिरी करू शकलेला नाही. या संघाने आतापर्यंत १० सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांना केवळ ४ सामने जिंकता आले आहेत आणि ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर एक सामना बरोबरीत सुटला आहे.
नवीन कुमार दुखापतीमुळे बाहेर आहे आणि त्यामुळे दबंग दिल्लीचा संघ थोडा कमकुवत दिसत आहे. आणखी काही सामने गमावल्यास ते प्लेऑफमधून बाहेर पडू शकतात.
बंगाल वॉरियर्स संघाने प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाचे विजेतेपद पटकावले. मात्र, त्यानंतर त्यांची कामगिरी तितकीशी चांगली झालेली नाही. या मोसमातही संघाला तेवढा चांगला खेळ करता आलेला नाही. गेल्या सामन्यात त्यांना गुजरातविरुद्ध अत्यंत वाईट पराभवाला सामोरे जावे लागले होते.
या संघाने आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत, त्यापैकी ३ सामने जिंकले आहेत, ३ हरले आहेत आणि २ सामने बरोबरीत सुटले आहेत.
पीकेएलच्या सहाव्या हंगामातील चॅम्पियन संघ बेंगळुरू बुल्सने या मोसमात बरीच निराशा केली आहे. परदीप नरवालच्या संघाने आतापर्यंत केवळ २ सामने जिंकले असून ७ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत संघ ११व्या स्थानावर आहे. बुल्ससाठी, या हंगामात रेडर्स आणि बचावपटू चांगली कामगिरी करत नाहीत. अशा स्थितीत संघाला प्लेऑफमध्ये जाणे कठीण वाटत आहे.