हिंदू धर्मात आषाढ महिन्याला विशेष महत्व आहे. तसेच या महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे. आषाढ हा चातुर्मासातील पहिला महिना असतो. या महिन्यात योगिनी एकादशी साजरी केली जाणार आहे. या एकादशीचा व्रत कठीण असला तरी त्याचा तितकाच चांगला लाभ मिळतो. योगिनी एकादशीलाच मोक्षदायिनी एकादशी असेही संबोधले जाते. वैदिक शास्त्रानुसार, योगिनी एकादशीचा उपवास भगवान विष्णूच्या निद्राकाळाच्या आधी पाळला जातो. योगिनी एकादशीनंतर भगवान विष्णू देवशयनी एकादशीपासून ४ महिने निद्रेत असतात.
हिंदू पंचांगानुसार, वर्षभरात तब्बल २४ एकादशी साजऱ्या केल्या जातात. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणून संबोधले जाते. एकादशी ही भगवान विष्णूंची अतिशय प्रिय तिथी आहे. याकाळात भगवान विष्णूची तपस्या केली जाते. एकादशीच्या काळात मनोभावाने आणि योग्य विधीनुसार भगवान विष्णूंचे पूजन केल्याने, भक्तांना विष्णू देवाची शुभ दृष्टी प्राप्त होते. आणि त्यांच्या आयुष्यात सुखसमृद्धी येते.
वैदिक शास्त्रानुसार, योगिनी एकादशीचे व्रत योग्य विधी आणि तिथीनुसार पाळल्यास इच्छित फळ मिळते. यादिवशी सकाळी उठून स्नान करून भगवान विष्णूचे ध्यान आणि आराधना करून व्रत ठेवावे. विशेष म्हणजे योगिनी एकादशीचा उपवास नियमानुसार पूर्ण करणाऱ्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन धनाचा वर्षाव करते. शुभ लाभ मिळण्यासाठी हा उपवास अगदी मनोभावाने करणे आवश्यक आहे. शिवाय योगिनी एकादशीला काही गोष्टी वर्ज्य कराव्या लागतात. त्या गोष्टी योगिनी एकादशी दिवशी केल्यास तुम्हाला अशुभ फळ मिळण्याची शक्यता असते. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
ज्योतिषशास्त्रानुसार, योगिनी एकादशीच्या दिवशी भात खाण्यास सक्त मनाई आहे. योगिनी एकादशीला भात खाल्ल्याने दोष निर्माण होऊ शकतो. तसेच भगवान विष्णूला अर्पण केलेल्या प्रसादात तुळशीच्या पानांचा समावेश अवश्य करावा. मात्र एकादशीच्या आधीच तुळशीची पाने घेऊन ठेवावी. यामागेसुद्धा महत्वाचे कारण आहे. शास्त्रानुसार योगिनी एकादशी दिवशी तुळशीसुद्धा भगवान विष्णूच्या आशीर्वादासाठी उपवास करते. आणि म्हणूनच त्यादिवशी तुळशीला पाणी घालणे, तुळशीची पाने तोडणे या गोष्टी अशुभ असतात. शिवाय योगिनी एकादशीला कांदा, लसूण, आणि अन्य तामसिक पदार्थांचे सेवन करणे अशुभ असते. जर तुम्ही एकादशी दिवशी या गोष्टी केला तर तुम्हाला विष्णू देवाचा आशीर्वाद प्राप्त होत नाही. तुम्हाला याचं मोठं नुकसान सहन करावं लागतं.
यंदा योगिनी एकादशी २ जुलै २०२४ रोजी साजरी केली जाणार आहे. विशेष म्हणजे योगिनी एकादशी कृतिका नक्षत्रात होणार आहे. हिंदू पंचांगानुसार १ जुलै २०२४ रोजी सकाळी १० वाजून २६ मिनिटांनी एकादशी आरंभ होईल. तर २ जुलै २०२४ रोजी सकाळी ८ वाजून ३४ मिनिटांनी समाप्त होईल. तिथीनुसार योगिनी एकादशीचा उपवास २ जुलैला ठेवला जाणार आहे.
संबंधित बातम्या