मराठी बातम्या  /  धर्म  /  World Sleep Day : कोणत्या दिशेला पाय करुन झोपावं?, काय सांगतं शास्त्र?

World Sleep Day : कोणत्या दिशेला पाय करुन झोपावं?, काय सांगतं शास्त्र?

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Mar 17, 2023 11:05 AM IST

Importance Of Sleeping Sides : शास्त्रात किंवा धर्मग्रंथात झोपेविषयी काही महत्वाची माहिती दिली आहे. सासरी असाल तर कोणत्या दिशेला तोंड करुन झोपाल, कोणत्या दिशेला तोंड करुन झोपावं, झोपताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी अशा अनेक बाबी त्यात सांगण्यात आल्या आहेत.

वर्ल्ड स्लीप डे
वर्ल्ड स्लीप डे (हिंदुस्तान टाइम्स)

उत्तरे पश्चिमे चैव न स्वपेद्धि कदाचन..

स्वप्रादायु: क्षयं याति ब्रह्महा पुरुषो भवेत.

न कुर्वीत तत: स्वप्रं शस्तं च पूर्व दक्षिणम..

असं झोपेचं वर्णन केलं गेलं आहे. पूर्व किंवा दक्षिण दिशेला तोंड करुन झोपणं किती महत्वाचं आहे हे या श्लोकात सांगितलं गेलं आहे. तिथेच, उत्तर आणि पश्चिम दिशेला तोंड करुन झोपल्याने रोग वाढतात आणि आयुष्य घटतं असाही या श्लोकाचा अर्थ आहे.

आज विश्व झोप दिवस अर्थात वर्ल्ड स्लीप डे (World Sleep Day) आहे. ज्याप्रमाणे आपल्याला अन्न जगण्यासाठी आवश्यक आहे, वस्त्र लज्जेसाठी आणि निवारा उनपावसापासून संरक्षणासाठी आवश्यक आहे, तितकीच झोपही आवश्यक आहे.

मात्र अर्धवट झोप होणे किंवा शांत झोप न लागणे किंवा झोपलेलं असताना वारंवार जाग येणे ही लक्षणं तुमच्यासाठी तुमचं आरोग्य चांगलं किंवा सुदृढ नसल्याची ग्वाही देतात.

धर्म पुराणातल्या ग्रंथांमध्ये झोपेबाबत काही मजेशीर गोष्टी सांगितल्या आहेत.

स्वगृहे प्राक्छिरा: सुप्याच्छ्वशुरे दक्षिणाशिरा:.

प्रत्यक्छिरा: प्रवासे तु नोदक्सुप्यात्कदाचन..

अर्थात जर तुम्ही स्वत:च्या घरी झोपत असाल तर तुमचं डोकं पूर्वेला असावं, सासरी असाल तर तुमचं डोकं दक्षिण दिशेला असावं आणि जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुमचं डोकं पश्चिम दिशेला असावं असं त्यात सांगण्यात आलं आहे.

झोप येण्यासाठी जसं भरलेलं पोट आणि तृप्त मन किंवा शांत मन असावं असं सांगितलं गेलं आहे त्याचप्रमाणे झोप येण्यासाठी काही मंत्रसुद्धा सांगण्यात आले आहेत. हे मंत्र म्हटल्याने शांत आणि चांगली झोप लागते असं शास्त्र सांगतं.

वाराणस्यां दक्षिणे तु कुक्कुटो नाम वै द्विज:।

तस्य स्मरणमात्रेण दु:स्वपन: सुखदो भवेत्।।

या देवी सर्वभूतेषु निद्रा-रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

अच्युतानन्त गोविन्द नामोच्चारणभेषजात्।

नश्यन्ति सकला: रोगा: सत्यं सत्यं वदाम्यहम्।।

झोपेबाबत शास्त्रात आणि पुराणग्रंथात काही नियम सांगितले आहेत. लवकर नीजे लवकर उठे…हा मूलमंत्र तर सर्वात महत्वाचा आहेच. मात्र झोपताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करु नयेत याबाबतही शास्त्र किंवा पुराणवेद काही माहिती देतात.

निरोगी शरीर आणि दीर्घायुष्यासाठी ब्रह्म मुहूर्तावर जागरण करावे असं पद्मपुराण सांगतं.

निर्जन किंवा निर्जल घरात कधीही एकटे झोपू नये. यासोबतच कोणत्याही मंदिरात किंवा स्मशानभूमीत कधीही झोपू नये असं मनुस्मृती सांगते.

भविष्य पुराणात असं वर्णन आढळतं की, व्यक्तीने झोपण्यापूर्वी नेहमी हात पाय धुवावेत.

तर विष्णु पुराणानुसार, कधीही अस्वच्छ किंवा घाण पलंगावर झोपू नये. झोपण्याचा पलंग नेहमी स्वच्छ असावा.

 

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग