छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे महान शासक छत्रपती शिवाजी यांचे ज्येष्ठ पुत्र होते. संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला होता. संभाजीराजे २ वर्षांचे असताना त्यांची आई सईबाई यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर राजमाता जिजाबाई (जिजाऊ) यांनी त्यांचा सांभाळ केला.
१४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची साजरी केली जाते. छत्रपती संभाजी महाराजांची जयंती वर्षातून दोनदा साजरी होते. १४ मे ही त्यांची तारखेनुसार जयंती आहे. तर पंचांग मानणारे काही लोक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती तिथीनुसारही साजरी करतात.
संभाजी राजेंच्या जयंती दिवशी विविध कर्यक्रमांचे आयोजन केले जाते. छत्रपतींच्या शौर्याचे पोवाडे गायले जातात. गड-किल्ल्यांवर उत्सवांचे आयोजन होते. इतिहासाच्या पानापानांतून महाराजांच्या शौर्याचे धडे घेतले जातात.
१६८० मध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने पुन्हा दख्खनकडे (दक्षिण) लक्ष वळवले. मात्र, संभाजी महाराजांच्या शौर्यामुळे ते खूप कठीणच होते. १६८९ च्या सुरुवातीला छत्रपती संभाजी राजे यांचे मेहुणे गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला. मराठे आणि मुघल सैन्यात संघर्ष झाला. मराठ्यांची ताकद कमी पडली. शत्रूचा अचानक झालेला हल्ला मराठा मावळे परतवून लावू शकले नाहीत.
यावेळी संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यात मुघल सैन्य यशस्वी झाले. संभाजी राजे आणि कवी कलश यांना औरंगजेबासमोर हजर करण्यापूर्वी बहादूरगडला नेण्यात आले. औरंगजेबाने अट घातली होती की संभाजी राजांनी धर्मांतर केले तर त्यांचा जीव वाचेल. मात्र, संभाजी राजेंनी ही अट मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला. औरंगजेबाच्या ४० दिवसांच्या अनंत अत्याचारानंतर, ११ मार्च १६८९ रोजी फाल्गुन अमावस्येला संभाजी महाराजांचा मृत्यू झाला.
असह्य अत्याचार सहन करूनही संभाजी राजांनी स्वराज्य आणि धर्माप्रती असलेली निष्ठा सोडली नाही. त्यामुळे त्यांना धर्मवीर ही पदवी देऊन गौरविले.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणावे की स्वराज्य रक्षक यावरूनही महाराष्ट्रात वाद झाला आहे. देशातील हिंदुत्ववादी लोक संभाजीराजेंना धर्मवीर म्हणतात, तर पुरोगामी लोकांच्या मतानुसार संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक संबोधले पाहिजे.
पुरोगाम्यांचे म्हणणे आहे की काही लोक संभाजी महाराजांना विनाकारण हिंदुत्ववादी ठरवतात, त्यासाठी त्यांच्या नावापुढे धर्मवीर लावतात.
संभाजी महाराज हे आपल्या धर्माशी एकनिष्ठ होते. त्यासाठी प्रसंगी त्यांनी प्राणाचे बलिदान दिले. या त्यागाची आठवण म्हणून त्यांना 'धर्मवीर' ही उपाधी योग्यच आहे, असं हिंदुत्ववाद्यांचे म्हणणे आहे.
पण अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते असे वक्तव्य केल्यामुळे वाद झाला होता. मात्र, या दोन्ही उपाधी संभाजीराजांसाठी सार्थ आहेत, अशी समन्वयी भूमिका मोठ्या नेत्यांनी घेतल्यानंतर हा वाद मिटला.