Mahabharata :सत्याच्या बाजूने असूनही पांडव का गेले नरकात?, कसा झाला त्यांचा मृत्यू?
मराठी बातम्या  /  धर्म  /  Mahabharata :सत्याच्या बाजूने असूनही पांडव का गेले नरकात?, कसा झाला त्यांचा मृत्यू?

Mahabharata :सत्याच्या बाजूने असूनही पांडव का गेले नरकात?, कसा झाला त्यांचा मृत्यू?

Published Jun 18, 2023 09:20 AM IST

Story Of Mahabharata : आपलं संपूर्ण आयुष्य सत्यासाठी घालवूनही युधिष्ठिराला सोडल्यास सर्व पांडव नरकात का गेले. त्यांचा मृत्यू कसा झाला.

महाभारतातल्या कथा
महाभारतातल्या कथा (HT)

महाभारतात पांडवांकडे धर्माचे रक्षक किंवा सत्याच्या वाटेवर चालणारे म्हणून पाहिलं गेलं आहे तर कौरवांना असत्याच्या, दुराभिमानाच्या वाटेवर चालणारे म्हणून पाहिलं गेलं आहे. सहाजिकच धर्म किंवा सत्य पांडवांच्या बाजूने असल्याने या धर्मयुद्धात किंवा महायद्धात पांडवांचा विजय झाला आणि कौरवांचा पराभव झाला.

मात्र इतकं सगळं घडूनही दुर्योधन स्वर्गात गेला हे तुम्हाला माहिती आहे का आणि युधिष्ठिर सोडल्यास द्रौपदीसह सर्व पांडव नरकात गेले हे सांगितल्यास तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. मात्र हे सत्य आहे. या मागची कहाणी काय आहे हे आज आपण पाहाणार आहोत.

महाभारतातल्या युद्धानंतर पांडवांनी ३६ वर्ष राज्य केलं. मात्र श्रीकृष्णाचा झालेला मृत्यू त्यांना हळहळ लावून गेला. त्यानंतर द्रौपदीसहित सर्व पांडवांनी जीवंतपणीच स्वर्गात जायचं ठरवलं. ठरवल्याप्रमाणे सर्व पांडव स्वर्गाच्या दिशेने प्रस्थान करू लागले.

एक एक करून कोसळू लागले पांडव

जेव्हा पांडव स्वर्गाच्या दिशेने प्रवास करत होते तेव्हा त्यांच्या सोबत त्यांचा एक प्रिय श्वानही होता. अचानक द्रौपदी खाली कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमागे तिचे पाच पती असूनही सर्वात जास्त प्रेम ती अर्जुनावर करत होती याचा द्रौपदीला फटका बसला.

त्यानंतर काही वेळात सहदेव खाली पडला. भीमाने सहदेव का पडला असं विचारल्यावर युधिष्ठिर म्हणाला की सहदेवाला त्याच्या बुद्धीवर खूप घमेंड होती. हीच घमेंड त्याच्या नाशाला कारणीभूत ठरली.

पाहाता पाहाता नकुलही खाली पडला. तेव्हा युधिष्ठिर म्हणाला की नकुलाला आपल्या रुपावर अत्यंत गर्व होता. हाच गर्व त्याच्या पतनाचं कारण ठरला.

थोड्याच वेळात अर्जुनही खाली पडला. अर्जुनाला आपल्या धनुष्य विद्येवर प्रचंड अभिमान होता आणि त्याच अभिमानाने अर्जुनाचा बळी घेतला.

शक्तीशाली भीमही खाली पडू लागला तेव्हा भीमाने युधिष्ठिराला आपल्या खाली पडण्याचं कारण विचारलं. त्यावेळेस युधिष्ठिर म्हणाला की भीमा, तुला तुझ्या बळाचा खूप गर्व होता आणि तू गरजेपेक्षा जास्त अन्न ग्रहण करत होतास.

सरतेशेवटी स्वर्गाचे दरवाजे उघडले आणि युधिष्ठिर स्वर्गात जात होता मात्र इंद्र त्या श्वानाला आत घेण्यास राजी होत नव्हता. मग त्या श्वानाने आपलं खरं रूप दाखवलं. तो श्वान म्हणजे साक्षात यमदेव होते.अशा प्रकारे धर्मराज युधिष्ठिर सदेह स्वर्गात दाखल झाले.

 

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner