पंचांगानुसार महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावा दिवस एकादशी म्हणून साजरा केला जातो. पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते. त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते. पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते. या एकादशीला वैकुंठ एकादशी असेही म्हणतात. आज शुक्रवार १० जानेवारी २०२५ रोजी पुत्रदा एकादशी असून, एकादशीला तांदूळ का खात नाही याचे वैज्ञानिक आणि पौराणिक कारण जाणून घेऊया.
शरीररूपी यंत्राची डागडुजी म्हणजे नियमित आहार, व्यायाम आणि झोप. यंत्र सतत वापरात असेल, तरीही ते काम करणे बंद करते. त्यामुळे त्याला सक्तीची विश्रांती द्यावी लागते.
आपण अन्नग्रहण करतो परंतु ते पचण्यासाठी पुरेसा अवधी देत नाही. एक अन्न पचत नाही, तोवर दुसरे अन्न ग्रहण करतो. ही प्रक्रीया सतत सुरू राहिल्यामुळे शरीराची यंत्रणा बिघडते. यासाठी पंधरा दिवसांनी एकदा एकादशीचा उपास करावा. उपास शक्यतो काहीही न खाता करावा. गरज लागली, तर फलाहार करावा. मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी या उक्तीप्रमाणे फराळ केला जाणार असेल, तर त्याचा काहीही फायदा नाही. अनेक जण उपास जमत नसेल तर काही गोष्टी वर्ज्य करून एकादशी करतात. त्यात प्रामुख्याने तांदूळ खाऊ नये असे सांगितले जाते. त्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते.
महर्षि मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला. यानंतर, त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वीगर्भात पडला. असे मानले जाते की, ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते, त्या दिवशी एकादशी होती. तसेच महर्षी मेधाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला. तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते. म्हणून एकादशीला तांदूळ खात नाहीत. एकादशीला भात खाणे हे महर्षी मेधाचे मांस आणि रक्त सेवन करण्यासारखे आहे असे मानले जाते.
वैज्ञानिक दृष्टीकोनानुसार तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे. त्याच वेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. तांदूळ खाल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते, यामुळे मन विचलित व चंचल होते. मनाची चंचलता उपवास करण्याच्या नियमांमध्ये अडथळा आणते. म्हणूनच एकादशीला तांदळाच्या गोष्टी खाण्यास मनाई आहे.
संबंधित बातम्या