Narak Chaturdashi 2024: नरक चतुर्दशीला का म्हणतात छोटी दिवाळी, या दिवशी काय केलं जातं?
मराठी बातम्या  /  धर्म  /  Narak Chaturdashi 2024: नरक चतुर्दशीला का म्हणतात छोटी दिवाळी, या दिवशी काय केलं जातं?

Narak Chaturdashi 2024: नरक चतुर्दशीला का म्हणतात छोटी दिवाळी, या दिवशी काय केलं जातं?

Updated Oct 30, 2024 11:10 AM IST

Narak Chaturdashi 2024: नरक चतुर्दशी हा कार्तिक मासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला येणारा दिवस आहे. या दिवसाला छोटी दिवाळी असेही संबोधले जाते. या दिवसाशी अनेक धार्मिक कथा जोडल्या गेल्या आहेत.

नरक चतुर्दशीला का म्हणतात छोटी दिवाळी, या दिवशी काय केलं जातं?
नरक चतुर्दशीला का म्हणतात छोटी दिवाळी, या दिवशी काय केलं जातं?

 

Narak Chaturdashi as Chhoti Diwali: दीपावलीच्या ५ दिवसांच्या उत्सवात नरक चतुर्दशी हा दुसऱ्या दिवशी येणारा सण आहे. या दिवसाला छोटी दिवाळीअसे म्हटले जाते. याच दिवशी हनुमान जयंती देखील असते. नरक चतुर्दशीच्या रात्रीची पूजा, बुधवारी ३० ऑक्टोबरला होईल. उदया तिथीनुसार रूप चतुर्दशीचे अभ्यंग स्नान ३१ ऑक्टोबर रोजी होईल. नरक चतुर्दशी छोटी दिवाळी, कार्तिक आमावस्येला मोठी दिवाळी आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते. पाहुया, नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी का म्हटले जाते.

नरक चतुर्दशीला का म्हटले जाते छोटी दिवाळी?

कार्तिक मासाच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला छोटी दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्यानंतर १६ हजार महिलांना त्यांच्या कैदेतून मुक्त केले. त्यानंतर देवलोकांनाही स्वतंत्र केले. याच आनंदासाठी सर्वत्र दीपक उजळून उत्सव साजरा केला जातो. याच दिवशी श्रीकृष्ण, हनुमान आणि यमदेवाची पूजा केली जाते. या दिवाळीच्या दिवशी अभ्यंग स्नानाने व्यक्तीचे रुपही उजळते. तसेच यमाच्या नावाने दिवा लावून मृत्यूनंतर नरकात जाणे टाळता येतो अशी धार्मिक मान्यता आहे.

भगवान श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामा यांच्यासहकार्याने नरकासुर दैत्याचा वध केला होता. या दैत्याचे नाव भौमासुर असेही होते. या नरकासुराने १६ हजार स्त्रियांना कैदेत डांबून ठेवले होते. नरकासुराने इंद्रदेवाचे राज्य देखील आपल्या ताब्यात ठेवले होते. याच कारणामुळे भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता.

नरकापासून वाचण्यासाठीही साजरी केली जाते छोटी दिवाळी

या बाबतीत तिसरी कथाही सांगितली जाते. त्यानुसार रंतिदेव नावाचा एक धर्मात्मा राजा होऊन गेला. त्याने नकळतपणे देखील कोणतेही पाप केले नाही. तरीही मृत्यूची वेळ जवळ आल्यानंतर यमदूत त्याला नरकात येण्याची तयारी करू लागला. राजा म्हणाला की माझ्यावर कृपा करा आणि सांगा की मला कोणत्या पापामुळे नरकात नेले जात आहे. हे ऐकून यमदूत म्हणाला की, हे राजा, एकदा तुझ्या दारावरून एक ब्राह्मण भुकेला परतला होता. हे त्यात पापाचे फळ आहे. हे ऐकून राजाने यमदूताकडे एक वर्षाची वेळ मागितली. त्यानंतर यमदूताने राजाला एक वर्षाची मुदत दिली. राजा आपली चिंता घेऊन ऋषींकडे गेला आणि त्यांना आपली सर्व कहाणी कथन केली. या पापापासून मला मुक्ती मिळावी यासाठी मी काय करावे असे राजाने ऋषींना विचारले.

त्यावर ऋषींनी राजाला सांगितले की, कार्तिक मासाच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला व्रत करावे आणि ब्राह्मणांना भोजनदान द्यावे. त्यानंतर त्यांच्याकडे आपल्या अपराधांसाठी क्षमायाचना करावी. ऋषींनी जे काही सांगितले तसेच राजाने केले. अशा प्रकारे राजा पापमुक्त झाला आणि त्याला विष्णुलोकात स्थान प्राप्त झाले. त्या दिवसापासून पाप आणि नरकापासून मुक्ती मिळवण्याच्या हेतूने भूलोकात कार्तिक चतुर्दशीला व्रत केले जाते.

राजा बळीच्या राज्यात साजरी केली जाते दिवाळी

या दिवशी दक्षिण भारतात वामनपूजा देखील केली जाते. असे म्हणतात की, बळीला (महाबली) भगवान विष्णुने वामन अवतारात दरवर्षी त्यांच्याकडे पोहोचण्याचा आशीर्वाद दिला होता. याच कारणामुळे वामनपूजा केली जाते. बळी म्हणाले, हे भगवान, तुम्ही कार्तिक कृष्ण त्रयोदशीपासून आमावस्येच्या अवधीत माझी संपूर्ण पृथ्वी मोजली आहे. म्हणून जी व्यक्ती माझ्या राज्यात चतुर्दशीच्या दिवशी यमराजाच्या निमित्त दीपदान करेल, त्या व्यक्तीला यमयातना होऊ नयेत आणि जी व्यक्ती या पर्वात दिवाळी साजरी करेल त्याचे घर देवी लक्ष्मी कधीही सोडणार नाही. 

ही प्रार्थना ऐकल्यानंतर भगवान वामन म्हणाले की, राजन,असेत होईल... तथास्तु. भगवान वामन यांनी राजा बळीला दिलेल्या या वरदानानंतर नरक चतुर्दशीच्या दिनी यमराजाच्या निमित्ताने व्रत, पूजन आणि दीपदानाचे प्रचलन सुरू झाले.

डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner