Maghi Ganesh Jayanti: माघ शुद्ध चतुर्थीला भगवान श्री गणेशाचा जन्म झाला. हा दिवस गणेश जयंती किंवा माघ गणपती या नावाने साजरा केला जातो. भादप्रद महिन्यातील गणेशोत्सवाप्रमाणेच माघी गणपतीत देखील श्री गणेशाची पूजा केली जाते. गणपतीने तीन अवतार घेतल्याचे सांगितले गेले आहे. या तीन अवतारांचे तीन जन्मदिन साजरे करण्याची प्रथा आहे. त्यांपैकी एक म्हणजे माघी गणपती.
गणपतीने एकूण तीन अवतार घेतल्याचे मानले गेले आहे. गणपतीने पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घेतला. हा दिवस पुष्टिपती विनायक जयंती म्हणून साजरा केला जातो. तर, दुसरा अवतार हा भाद्रपद शुक्ल चतुर्थीला घेतला गेला. या दिवसाला श्रीगणेश चतुर्थी म्हणून पार्थिव गणेश पूजन करून साजरा केला जातो. तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला घेतला. हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो.
गणेश जयंतीच्या दिवशी नक्तव्रताचे आचरण करून ढुंढिराजाचे पूजन केले जाते आणि तिळसाखरेचे किंवा तिळगुणाचे मोदक अर्पण केले जातात. त्याच प्रमाणे दिवसभर उपवास करून सूर्यास्तानंतर भोजन केले जाते. गणेशान नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून या चतुर्थीला विनायकी चतुर्थी असेही म्हटले जाते. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात.
गणेश चतुर्थीच्या दिवशी पाण्यात तिळ घालून त्या पाण्याने स्नान केले जाते. तसेच उपवास देखील केला जातो. माघ महिन्यातील गणेश जयंतीला धातूत्या, पाषाणाच्या किंवा मातीच्या गणेशमूर्तीचे पूजन केले जाते. प्रथम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. तसेच आवाहन, आसन, पाद्य, अर्ध्य, आचमन, स्नान, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, दीप, नैवेद्य, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार अशा एकूण १६ उपचारांनी श्रीगणेशाचे पूजन केले जाते.
तसेच माघ महिन्यातील गणेशपूजनात पत्री अर्पण न करता दूर्वा अर्पण केल्या जातात. त्याच प्रमाणे पुराणाच्या मोदकाऐवजी तिळसाखरेच्या मोदकाचा प्रसाद अर्पण केला जातो. या पूजेसाठी गणेशमूर्ती लहान असावी असे सांगितले गेले आहे. विशेष म्हणजे या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी उत्तरपूजा करून या मूर्तीमधील देवत्व काढून घेतले जाते. त्यानंतर मूर्तीचे विसर्जन केले जाते.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या