मराठी बातम्या  /  धर्म  /  Krishna Janmashtami : श्रीकृष्णाने मथुरा सोडण्याचा निर्णय का घेतला?, वाचा जन्माष्टमीची रंजक गोष्ट

Krishna Janmashtami : श्रीकृष्णाने मथुरा सोडण्याचा निर्णय का घेतला?, वाचा जन्माष्टमीची रंजक गोष्ट

Sep 05, 2023 12:48 PM IST

Krishna Janmashtami Special : भगवान श्रीकृष्ण यांना मथुरा सोडावी लागली, यामागे अनेक कारणं सांगितली जातात. याशिवाय जन्माष्टमीशीही या कारणाचा संबंध जोडला जातो.

Krishna Janmashtami 2023
Krishna Janmashtami 2023 (PTI)

Krishna Janmashtami 2023 : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जाणार आहे. जन्माष्टमी उद्या म्हणजेच सहा सप्टेंबरला साजरी करण्यात येणार असली तरी देशातील अनेक ठिकाणी आजपासूनच जन्माष्टमीच्या सणाचा जल्लोष सुरू झाला आहे. परंतु जन्माष्टमीच्या निमित्ताने पुराणात अनेक रंजक कथांचा उल्लेख करण्यात आला आहे. मथुरा, वृंदावन यांसह अनेक धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जन्माष्टमीचं वेगळंच महत्त्व आहे. भगवान श्रीकृष्ण यांच्या बालपणापासून तारुण्यापर्यंतच्या अनेक कहाण्या लोकांमध्ये सांगितल्या जातात. परंतु भगवान श्रीकृष्ण यांना जन्मस्थान मथुरा का सोडावे लागले?, याचं कारण तुम्हाला माहितीय का?, चला तर जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

भगवान श्रीकृष्ण यांना जन्मनगरी मथुरा अत्यंत प्रिय होती. त्यांचं संपूर्ण बालपण हे गोकुळ, वृंदावन, नांदगाव आणि बरसाणा या परिसरात गेलं. क्रूर असलेल्या मामा म्हणजेच कंसाचा वध केल्यानंतर श्रीकृष्ण यांनी आई-वडिलांना तुरुंगातून मुक्त केलं. त्यानंतर जनतेच्या विनंतीवरून कृष्णाने मथुरेचं संपूर्ण राज्य हातात घेतलं. परंतु कंसाचा वध केल्यानंतर जरासंध हे कृष्णाचे कट्टर शत्रू झाले. जरासंधाला आपलं साम्राज्य वाढवायचं होतं, त्यामुळं त्याने अनेक राजांना पराभूत करून ठार मारलं होतं. मथुरा काबीज करून कृष्णाकडून सूड घ्यायचा उद्देश जरासंधाचा होता. त्यामुळं त्याने मथुरेवर तब्बल १८ वेळा हल्ला केला. परंतु त्यातील अनेकवेळा तो मथुरा जिंकण्यात अपयशी ठरला.

सतत होत असलेल्या युद्धामुळं मथुरेतील जनता कंटाळली होती. त्यामुळं कृष्णाने सर्व नागरिकांसहित मथुरा सोडण्याचा निर्णय घेतला होता. युद्धातून पळून न जाता ठरवलेल्या, निवडलेल्या जागेसाठी लढणार असल्याचं धोरण श्रीकृष्ण यांनी आखलं होतं. त्यानंतर कृष्णाने द्वारका शहराची स्थापना केली. सुरक्षेसाठी संपूर्ण शहराला चारही बाजूंनी मजबूत तटबंदी केली. त्यानंतर कृष्णाने या नव्या शहरावर तब्बल ३६ वर्ष राज्य केलं. देवकी आणि वासुदेव अनकदुंदुभी यांचा पुत्र श्रीकृष्ण हा आहे. श्रीकृष्णाचा जन्मदिवस जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. वैष्णव परंपरेत कृष्णाला सर्वोच्च देव मानलं जातं. भाद्रपद महिन्याच्या आठव्या दिवशी कृष्णाचा जन्म झाला, असं पुराणात नमूद करण्यात आलं आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel
विभाग