Who Is Pandit Laxmikant Dixit :अयोध्येत आज राम मंदिरात रामाच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. यामुळे संपूर्ण देशात राममय वातावरण झाले आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लोक अयोध्येत पोहोचत आहेत. श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आज दुपारी १२.२० वाजता सुरू होईल. म्हणजेच रामललाच्या अभिषेकाचा शुभ मुहूर्त आता जवळ आला आहे.
राम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त ८४ सेकंदांचा आहे. राम मंदिरात रामाचा अभिषेक १२१ पुजार्यांची टीम करणार आहे. काशीचे विद्वान लक्ष्मीकांत दीक्षित हे मुख्य पुजारी असतील. ते या १२१ पुजाऱ्यांचे नेतृत्व करतील. रामलल्लाच्या अभिषेकवेळी लक्ष्मीकांत दीक्षित यांच्यासह ५ जण गर्भगृहात उपस्थित राहतील.
पंडीत लक्ष्मीकांत दीक्षित हे मूळचे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील आहेत. मात्र त्यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपासून काशीमध्ये राहत आहे. त्यांच्या पूर्वजांनीही नागपूर आणि नाशिक या संस्थानांत अनेक धार्मिक विधी पार पाडले आहेत.
लक्ष्मीकांत दीक्षित हे वाराणसी येथील मीरघाट सांगवेद महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापकदेखील आहेत. सोबतच पंडित लक्ष्मीकांत हे यजुर्वेदाचे सर्वोत्तम अभ्यासकांमध्ये गणले जातात. पूजेच्या पद्धतीतही त्यांनी प्रभुत्व मिळवले आहे. लक्ष्मीकांत दीक्षित यांनी त्यांचे काका गणेश दीक्षित भट्ट यांच्याकडून वेद आणि विधींची दीक्षा घेतली.
पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचा मुलगा सुनील यांनी सांगितले की, ते यज्ञ आणि अनेक धार्मिक विधींमध्ये माहिर आहेत. अनेक वर्षांपासून काशीमध्ये ते काम करत आहेत. विश्वेश्वर दत्त हे आपले पूर्वज असल्याचेही सुनिल यांनी सांगितले. विश्वेश्वर दत्त यांना गागा भट्ट म्हणून ओळखले जाते. गागा भट्ट यांना १७व्या शतकात प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. गागा भट्टांनींच १७ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला होता.
लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली १२१ पंडितांचा चमू १६ जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठेचा विधी करत आहे. या टीममध्ये काशीतील ४० हून अधिक विद्वानांचा समावेश आहे. प्रतिष्ठा विधी करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या वेदांच्या सर्व शाखांमधील १२१ पंडितांच्या संघाचे लक्ष्मीकांत दीक्षित हे नेतृत्व करतील.
संबंधित बातम्या