Gudi padwa 2024 : इंग्रजी कॅलेंडर म्हणजेच ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार दरवर्षी १ जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू होते. परंतु सर्व धार्मिक समुदायांमध्ये आपापल्या समजुतीनुसार नवीन वर्ष वेगवेगळ्या दिवशी साजरे केले जाते. तर, हिंदू कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून मानली जाते.
हिंदू दिनदर्शिकेनुसार, चैत्र महिन्याची प्रतिपदा ८ एप्रिल रोजी रात्री ११:५० वाजता सुरू होत आहे. तसेच, ही तारीख ९ एप्रिल रोजी रात्री ८:३० वाजता समाप्त होईल. अशा परिस्थितीत गुढीपाडव्याचा सण मंगळवारी ९ एप्रिल रोजी साजरा होणार आहे.
गुढी म्हणजे ध्वज, तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात. त्यामुळे हा सण गुढीपाडवा म्हणून ओळखला जातो. धार्मिक मान्यतेनुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती. त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी लोक आपली घरे स्वच्छ करतात. घर रांगोळी आणि फुलांच्या माळांनी सजवले जाते. यासोबतच मुख्य गेटवर आंबा किंवा अशोकाच्या पानांची कमान बांधलेली असते. गुढीपाडव्यात विविध प्रकारचे पदार्थही तयार केले जातात.
घरासमोर ध्वज म्हणजेच गुढी लावली जाते. यानंतर एका भांड्यावर स्वस्तिक बनवून त्यावर रेशमी कापड गुंडाळले जाते. तसेच या तिथीला सकाळी अंगाला तेल लावून स्नान करण्याची परंपरा आहे. उत्तम आरोग्यासाठी या दिवशी गुळासोबत कडुलिंब खाण्याचीही परंपरा आहे.
गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा (गुढीपाडवा इतिहास) सांगितल्या जातात. असं म्हणतात की, महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवली आणि नवीन वर्षाच्या सुरूवाताला तिची पुजा केली. या परंपरेचा आदर राखण्यासाठी गुढी पुजन केले जाऊ लागले. इतिहासात या दिवशी ब्रम्हदेवाने विश्व निर्मिती केली असं वेदात म्हटल्याचा उल्लेख आहे. पौराणिक कथेनुसार श्रीराम वनवासातून पुन्हा अयोध्येला परत आले म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. म्हणूनच यशाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. गुढीपाडवा का साजरा करतात यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. एका कथेनुसार पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याला ठरलं आणि तृतीयेला झालं होतं. म्हणूनच या दिवशी आदिशक्ती पार्वतीची पुजा केली जाते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)