Apara Ekadashi 2023 : अपरा एकादशीचं महत्व काय?, या दिवशी काय करणं टाळाल?
Importance Of Apara Ekadashi : अपरा एकादशीचं व्रत केल्याने सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते आणि स्वर्गसुख प्राप्त होतं असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.
अमर्याद लाभ आणि अमर्याद आशिर्वाद मिळवायचा असेल तर नक्कीच अपरा किंवा अचला एकादशीचं व्रत केलं पाहिजे. अपरा एकादशीचं व्रत केल्याने सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते आणि स्वर्गसुख प्राप्त होतं असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. हे व्रत भगवान श्रीविष्णू यांच्यासाठी केलं जातं. या व्रतात माता लक्ष्मीचीही पूजा केली जाते. यंदा हे व्रत १५ मे २०२३ रोजी करण्यात येणार आहे. वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी म्हणतात.
ट्रेंडिंग न्यूज
अपरा एकादशी म्हणजे नेमकं काय?
अपरा" या शब्दाचा अर्थ "अमर्यादित" आहे, जो अमर्याद लाभ आणि आशीर्वाद दर्शवतो. या एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्तांवर भगवान विष्णू असीम कृपा करतो. अपरा एकादशीचा उपवास लोकांना त्यांची पापक्षालन करण्यास, त्यांच्या आत्म्याला शुद्ध करण्यास आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यास मदत करते असं सांगितलं जातं.
अपरा एकादशीचे मुहूर्त कोणते?
पंचांगानुसार, वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी १५ मे २०२३ रोजी पहाटे ०२.४५ वाजता सुरू होत आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ मे २०२३ रोजी सकाळी ०१:०२ वाजता हे व्रत संपेल. १५ मे रोजी उदय तिथी येत असल्याने या दिवशी अपरा एकादशीचे व्रत केले जाईल.
अपरा किंवा अचला एकादशीच्या दिवशी काय करणे टाळावे?
मांसाहार करू नये
कोणतंही व्रत किंवा सण असो हे दिवस शाकाहाराचे दिवस म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या दिवशी मांसाहीर किंवा मद्यपान करणे टाळावे. मांसाहार केल्यास माणूस पापाचा भागीदार होतो आणि भगवान विष्णू त्याच्यावर कधीच प्रसन्न होत नाहीत.
कुणाचाही अपमान करू नये
एकादशीच्या दिवशी रागावू नये, खोटे बोलू नये किंवा ज्येष्ठांचा अपमान करू नये. धार्मिक दृष्टीकोनातून एकादशी व्रत हा कृती आणि विचार दोन्ही शुद्ध करण्याचा काळ मानला जातो. या दिवशी कोणत्याही प्रकारे नकारात्मक किंवा अशुद्ध कार्य करू नये.
धान्यापासून बनवलेल्या गोष्टी सेवन करू नये
धार्मिक मान्यतेनुसार, एकादशी व्रताचे मुख्य पैलू म्हणजे धान्य वर्ज्य करणे. त्यामुळे एकादशीच्या दिवशी आपल्या आहारात तांदूळ, गहू, डाळी इत्यादींचा समावेश न करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही उपवास केला असेल तर या दिवशी फक्त फळ, दूध इत्यादींचं सेवन करावं.