Gadge Baba death anniversary : डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा वेश, तर गावोगावी जाऊन लोकांची गटारं साफ करुन त्यांना स्वच्छतेचं महत्व शिकवून, त्यांच्याकडून मिळालेल्या पैशातनं त्या गावात शाळा किंवा हॉस्पिटलं बांधणारे संत गाडगे महाराज स्वातंत्र्यापूर्वीपासूनच जनजागृतीचं काम करत असत. विसाव्या शतकातल्या समाज सुधारणेसाठी झालेल्या आंदोलनांमध्ये गाडगेबाबा यांचं कार्य महत्वाचं ठरतं.
संत गाडगे महाराजांचं खरं नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर हे होतं. त्यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावतीतल्या शेंडगाव इथं झाला. लहानपणीपासूनच जनजागृती करण्याचं गाडगे महाराजांनी ठरवलं होतं आणि त्यासाठी ते गावोगावी भटकत असत.
गाडगेबाबांनी अनेक गावं पालथी घातली. ज्या गावात जाऊन ते आधी साफ सफाई करायचे त्याच गावात गाडगेबाबा प्रवचन करत असत. आपल्या प्रवचनातनं गाडगेबाबांनी तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगितलं. दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणाऱ्या गाडगेबाबांनी "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका" असं आपल्या प्रवचनातनं लोकांच्या मनावर बिबवलं.चोरी करू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असं त्यांना आपल्या प्रवचनातनं सांगितलं. आपल्या आवडीसाठी प्राणी मारता मात्र त्याला देवाचं नाव देऊ नका असा स्पष्ट विचार गाडगेबाबांनी मांडला. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला.
आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. गाडगेबाबा संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानत. मात्र मी कोणाचाही गुरु नाही आणि माझा कोणीही शिष्य नाही असं मात्र ते आवर्जुन सांगत.
महाराष्ट्र शासनानेही स्वच्छ गावांसाठी पुढाकार घेत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ही योजना राबवली होती.